मुंबई : भारत 130 कोटींचा देश आहे. मात्र क्रीडाप्रकारात मागे असून फक्त भाषणबाजीत पुढे असल्याची खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. ते सोलापुरात बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 23 व्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन राज्यपालांचे हस्ते करण्यात आलं. यावेळ राज्यातील जवळपास 20 विद्यापीठातील 3 हजार विद्यार्थी विविध स्पर्धांसाठी सोलापूर विद्यापीठात दाखल झाले आहेत.


पुढील तीन दिवस या स्पर्धांचे आयोजन सोलापूर वि्द्यापीठात करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रासह भारताच्या खेळातल्या कामगिरी बाबत खंत व्यक्त केली. 1952 नंतर देशाने बोटावर मोजण्याइतकेच पदकं मिळवले. त्यातही महाराष्ट्राची कामगिरी अंत्यत सुमार असल्याचे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. तर राज्याला अशा क्रिडास्पर्धातून चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास कोश्यारी यांनी व्यक्त केला.

संस्कृतवरुन स्तुती तर मराठीवरुन चिमटे -
क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमात सुत्रसंचालन संस्कृतमधून करण्यात आले. यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुलगुरुंचे कौतुक केले. संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे. अशात संस्कृतमधून सुत्रसंचालन केल्याचे समाधान कोश्यारी यांनी व्यक्त केलं. तर उपस्थित पाहुण्यापैकी कोणीच मराठीत भाषण केलं नाही यावरुन राज्यपालांनी कानपिचक्या ही काढल्या. मी उत्तराखंडमधून आल्यानंतर मराठीत शपथ घेतली. ज्याची चर्चा सर्व माध्यमातून झाली. मात्र, यात विशेष काही नाही, महाराष्ट्रात असाल तर मराठी शिकणे गरजेचे आहे. मात्र, या कार्यक्रमात कोणीच मराठीत भाषण केलं नाही. कुलगुरुंनी ही इंग्रजीत भाषण केलं. किमाण आभार तरी मराठीत मानावे असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिमटे काढले.

स्पर्धेसाठी विद्यापीठ सज्ज -
या आयोजनासाठी विद्यापीठाने 15 मैदाने तयार करुन घेतली आहेत. या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी राज्यातील 20 विद्यापीठांचे जवळपास 3 हजार विद्यार्थी व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. क्रीडा स्पर्धांसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात क्रीडा ज्योतीचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा समारोप 30 डिसेंबरला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणी आहे. क्रीडाप्रेमींनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन विदयापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विकास घुटे आणि क्रीडा संचालक डॉ. एस.के. पवार यांनी केले आहे.

हेही वाचा - भूमीपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार; राज्यपालांचे आश्वासन

Solapur University | आमदारांच्या नातेवाईकांचे गुण वाढवल्याचा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर आरोप | ABP Majha