बेळगाव : गेल्या चौसष्ट वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने बेजबाबदारपणाचे आणि बेताल वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर थांबवून गोळ्या घाला अशी गरळ कर्नाटक नवनिर्माण सेनेचा राज्याध्यक्ष भीमाशंकर पाटील याने ओकली आहे.

चौसष्ट वर्षांपासून सीमाभागातील सरकारी मालमत्तेचे आणि कन्नड जनतेच्या मालमत्तेचे महाराष्ट्र एकीकरण समिती नुकसान करत आहे. कन्नडिग जनतेच्या डोळ्यात कुसळा प्रमाणे टोचत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, त्याला माझा पाठिंबा आहे असे बेदरकार वक्तव्य भीमाशंकर पाटील याने पत्रकार परिषदेत केली आहे.

नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घाला असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले आहे. गेल्या चौसष्ट वर्षपासून महाराष्ट्र एकीकरण समिती सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहे. राकस्कोप जलाशयात विष टाकून कन्नड जनतेची हत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला असे सांगण्याचे धाडस मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे आहे काय असा हास्यास्पद सवालही भीमाशंकर याने पत्रकार परिषदेत केला.

नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षानी केलेले वक्तव्य अज्ञानातून केलेले आहे.त्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समितीने आजवर अनेक आंदोलने केली आहेत. पण आजवर कधीही सरकारी किंवा कन्नडीगाच्या मालमत्तेचे नुकसान केलेले नाही. मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी देखील कधी झालेली नाही. बाहेरील व्यक्ती येथे येऊन बेजबाबदार विधाने करुन शांती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अशा व्यक्तीची दखल घेऊन त्यांना योग्य ती समज देणे गरजेचे आहे. मराठी माणसाचा जर क्षोभ उसळला तर त्याची जबाबदारी पोलीस खाते आणि सरकारवर राहील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केली आहे.युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी देखील भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद -
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. बेळगाव-कारवार-निपाणी तसेच परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी आतूर आहे. कर्नाटक राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर कानडी भाषा शिकण्याची सक्ती केली जाते. काही वर्षांपूर्वी बेळगावचे नाव देखील तेथील सरकारने बदलले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कर्नाटक सरकारमध्ये या ना त्या कारणावरुन वाद सुरु असतात.

हेही वाचा - ...और हस्तियां डूब जाती है, संजय राऊतांची मोदी-शाहांवर बोचरी टीका

Karnataka By-Poll Results | कर्नाटक पोटनिवडणुकीत 10 जागांवर भाजपची आघाडी | ABP Majha