मुंबई : ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंडे आणि अश्विनी भिडे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकचे महापौर आणि पीएमपीएलचे आयुक्त म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर आता तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं अश्विनी भिडेंच्या खांद्यावर कोणती जबाबदारी सोपवण्यात येते याची जोरदार चर्चा सुरु आहे.


आज राज्य सरकारने 22 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे आणि अश्विनी भिडे यांच्या नावाचाही समावेश आहे. राज्य सरकारने त्यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.

मुंढे यांच्या हाती नागपूरची कमान
राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ज्या शहरात तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून किंवा प्रशासकिय अधिकारी म्हणून गेले, तिथं त्यांना स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. नागपूर हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड आहे. त्यामुळं तुकाराम मुंढेंच्या बदलीमागे हे कनेक्शन आहे का? असा सवाल आता चर्चिला जात आहे.

मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजीव निवतकर यांची मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील 2010 च्या तुकडीचे असलेले निवतकर यांनी विविध प्रशासकीय पदांवर काम केले आहे. 1994 मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती.

अश्विनी भिडेंबाबत शिवसेनेची मवाळ भूमिका
अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. आरे वसाहतीमधील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. मात्र, हे मतभेद बाजूला ठेवत ठाकरे सरकारकडून अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे वसाहतीमधील वृक्षतोडीवरुन वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांच्यावर शिवसेनेने टीका केली होती. यावेळी आरे येथील कारशेड प्रकल्प हलवल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका भिडे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर टीकादेखील केली होती. अश्विनी भिडे यांना हटवून सक्षम अधिकाऱ्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु ही मागणी पूर्ण झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेची राज्यात सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, तर आदित्य ठाकरेदेखील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार भिडेंची बदली करेल, असा अंदाज अनेक जण वर्तवत होते. परंतु सत्ता आल्यानंतर शिवसेनेने अश्विनी भिडे यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे.

आणखी काही महत्वाच्या बदल्या


एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची अतिरिक्त मुख्य सचिव जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक, तर याठिकाणी असलेले पराग जैन नानोटिया यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिव पदी करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या कार्यालय सचिव, उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा लावंगारे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिव तर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे मनपा आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. मुद्रांक शुल्क नोंदणी नियंत्रक व महानिरीक्षक अनिल कवडे यांची सहकार आयुक्त, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांना साखर आयुक्त, पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त एस एस डुंबरे यांची महासंचालक मेढा,अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची महानिरीक्षक व नियंत्रक मुद्रांक शुल्क विभाग, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची सामान्य प्रशासन विभाग सचिव, मेढा महासंचालक कांतीलाल उमप यांची उत्पादन शुल्क आयुक्त, आयुक्त सीईटी आनंद रायते यांची जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख या ठिकाणी नियुक्ती केली आहे. संपदा मेहता यांना सह आयुक्त विक्रीकर विभाग मुंबई, मुख्य सचिव यांचे सचिव राजीव निवतकर यांना मुंबई शहर जिल्हाधिकारी, मुख्य सचिव यांचे सचिव म्हणून नव्याने सनदी अधिकारी झालेले मंत्रालयातील उप सचिव किरण पाटील यांची,अकोला जिल्हा परिषद सीईओ आयुष्य प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषद सीईओ, तर या ठिकाणी असलेले सीईओ यु. ए. जाधव यांची अकोला जिल्हा परिषद सीईओपदी नियुक्ती केली आहे.



संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंनी घेतलेले अनेक निर्णय रद्द, नाशिकच्या महापौरांचे आदेश 

नाशिकचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली 

तुकाराम मुंढेंना आरतीला बोलवलं, जाता जाता मुंढे प्रसाद स्टॉल्सवर कारवाई करुन गेले

तुकाराम मुंढेंचा दणका, सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश 

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, मुख्य प्रवाहाबाहेर पाठवणी 

मुंढेंच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱ्या नाशिकच्या महापौर अडचणीत 

Ashwini Bhide in Majha Katta | मेट्रो प्रकल्पाची दिरंगाई नक्की कुणामुळे? मुंबई मेट्रो वुमन अश्विनी