दरम्यान हा वादग्रस्त व्हिडीओ त्या पेजवरुन अखेर हटवण्यात आला आहे. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, सोशल मीडियाच्या बाबतीत कोण काही व्हिडीओ बनवून व्हायरल करेल यावर कुणाचा निर्बंध असू शकत नाही. हा वादग्रस्त व्हिडीओ अशाच प्रकारे कुणीतरी व्हायरल केला. भाजपच्या बाबतीत संशय निर्माण करून टीका करण्याचा विषय तयार करण्याचा डाव त्यामागे दिसतो.
ते म्हणाले की, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना छत्रपतींच्या बाबतीत बोलायचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ते एक अद्वितीय ऐतिहासिक राजे होते आणि असे कर्तबगार राजे पुन्हा होणे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय घडलं?
आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद शमत नाही तोच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन नवा राजकीय वाद पेटला आहे. तान्हाजी सिनेमातील दृश्यांना मॉर्फ करुन शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. तसंच अरविंद केजरीवाल यांची उदयभानशी तुलना करण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओवरुन महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या संपूर्ण वादानंतर अखेर पॉलिटिकल किडा या पेजने वादग्रस्त व्हिडीओ यू-ट्यूबवरुन काढून टाकला आहे.
तान्हाजी चित्रपटावरुन व्हायरल झालेल्या वादग्रस्त राजकीय व्हिडीओवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता. भाजपनं या व्हिडीओबाबत भूमिका स्पष्ट करावी. तर, केंद्र सरकारनं या बाबत चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. दरम्यान, या वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी निवडणूक आयोगानं दखल घेण्याची मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल
Tanhaji Spoof Video | छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेचं समर्थन नाही, वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी भाजपच्या राम कदमांची प्रतिक्रिया
Tanhaji Political Spoof | तान्हाजीच्या पॉलिटिकल व्हिडीओमुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक, व्यक्तिरेखांना मोदी, शाहांचे चेहरे लावल्याने वाद