नाशिक :  नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द करणात आले आहेत. नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्याकडून प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत.


तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत ठरवलेल्या 2 लाख 79 हजार मिळकतीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत. घरपट्टी आणि अनधिकृत मिळकती संदर्भात काढलेल्या नोटिसा रद्द करण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यासोबतच अनधिकृत ठरवण्यात आलेल्या या मिळकतीचे फेरसर्व्हेक्षण करण्यास सांगितले आहे.


तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या 350 कोटी रुपयांची कामे रद्द करण्याच्या निर्णयाने आयुक्त आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यातील वादाला सुरवात झाली होती. जिथे गरज नाही अशा ठिकाणी रस्ते बांधणीचा सत्ताधाऱ्यांचा अट्टहास असताना त्यांनी ही कामे रद्द करण्याचे निर्णय घेतला होता. तर मुंढेंची बदली झाल्यानंतर आता रद्द झालेली ही कामे पुन्हा बजेटमध्ये घेण्याचा आदेश महापौरांनी दिला आहे.


कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची गेल्या बारा वर्षात 12 वेळा बदली झाली होती. तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकामुळे नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाची अडचण वाढली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता. त्यांनंतर मुंढे यांची मुंबईला बदली करण्यात आली. सध्या ते मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी कार्यरत आहेत.


मुढेंच्या बदलीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांच्या समर्थकांनी 'रामायण' या महापौर बंगल्यासमोर फटाके फोडले होते. मुंढे समर्थकांनी भानसी यांच्याविरोधात नाशकातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुपारी 12 ते एक या वेळेत फटाके उडवत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिककरांनी केली होती.


तुकाराम मुंढेंनंतर राधाकृष्ण गमे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाले आहेत.