नाशिक : नाशिक महानगरपालिकेच आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत.


लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील टोकाच्या संघर्षानंतर मुंढेंची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली होती.


नियुक्ती... वाद आणि बदली


नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली सीईओ म्हणून नियुक्ती, त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.


सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.


नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.


नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.


पुण्यातून नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिकमध्ये गेल्यावर त्यांनी केलेली करवाढ अवास्तव असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला होता.


तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या

महापालिका आयुक्त, सोलापूर (2006-07)

प्रकल्प अधिकारी, धारणी (2007)

उपजिल्हाधिकारी, नांदेड (2008)

सीईओ, नागपूर जिल्हा परिषद (2008)

अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नाशिक (2009)

के. व्ही. आय. सी. मुंबई (2010)

जिल्हाधिकारी, जालना (2011)

जिल्हाधिकारी, सोलापूर (2011-12)

विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई (2012)

आयुक्त, नवी मुंबई महापालिका (2016)

पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे (2017)

नाशिक महापालिका आयुक्त (2018)