World News: जीवनात काही तरी थ्रील (Thrill) हवं, यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. काही लोक अॅडव्हेंचर (Adventure) करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक थ्रील करण्याच्या नादात खरंच आपला जीव गमावून बसतात. आता अशीच काहीशी धक्कादायक घटना ऑस्ट्रियातून समोर आली आहे, जिथे एक ब्रिटीश व्यक्ती नाही ते साहस करायला गेला आणि त्या दरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
ब्रिटनमधील (Britain) हा व्यक्ती डोंगर पार करण्यासाठी दोन डोगरांदरम्यान बांधण्यात आलेली शिडी चढत होता, ज्याला 'स्वर्गाची शिडी' असंही म्हणतात. मात्र एका चुकीमुळे या माणसाचा तोल गेला आणि तो 300 फुटांवरुन थेट खाली कोसळला. इतक्या उंचीवरून खाली पडल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
या जागेला म्हणतात 'स्वर्गाची शिडी' (Stairways to heaven)
युरोपियन देश ऑस्ट्रियामध्ये (Austria) डॅचस्टीन पर्वत (Dachstein Mountain) आहे, जिथे लोक आपले फोटो काढण्यासाठी येतात. डोंगराच्या एका भागाला डोनरकोगेल (Donnerkogel) असं म्हणतात. या डोंगराचे दोन भाग आहेत, एक लहान आणि एक मोठा भाग. डोंगराचे हे दोन्ही भाग जोडण्यासाठी 130 फूट जिना बसवण्यात आला आहे, ज्याच्या सहाय्याने लोक डोंगराच्या एका भागावरुन दुसऱ्या भागावर जातात. या दरम्यान खाली 300 फूट खोल दरी असते. हा जिना किंवा शिडी चढणं तसं साहसी आहे, पण छोट्याशा चुकीमुळे जीवही जाऊ शकतो. मात्र लोक फोटो काढण्यासाठी हा भयानक जिना चढण्याचं साहस करतात आणि जिना चढत असताना दुसऱ्या कुणाला त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढायला सांगतात.
स्वत:च्या चुकीमुळे गमावला जीव
न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, ब्रिटीश व्यक्ती एकटाच ही शिडी चढून लहान डोंगराकडून मोठ्या डोंगरावर जात होता. शिडी चढत असताना मधेच त्याला थोडा त्रास जाणवला आणि त्यानंतर तो व्यक्ती 300 फूट खोल दरीत पडला. या प्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्यांचं म्हणणं आहे की, "स्वतःच्या चुकीमुळे पडून ब्रिटीश व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्यू मागे दुसरा कोणताही व्यक्ती जबाबदार नाही."
पायऱ्या चढताना सुरक्षीततेची घेतली जाते पूर्ण काळजी
डोंगराच्या दोन भागांना जोडणाऱ्या या शिडीला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे, त्यामुळे अनेक जण व्हायरल व्हिडीओ पाहून या ठिकाणी साहस अनुभवायला येतात. असं म्हणतात की, जर कोणाला खरोखरच थरार (Thrill) अनुभवायचा असेल तर त्याने एकदा तरी येऊन ही शिडी चढायला हवी. या शिडीवर चढण्याआधी लोकांच्या सुरक्षिततेची खात्री केली जाते. शिडीवर पाऊल ठेवण्यापूर्वी चढणाऱ्या व्यक्तीला हार्नेसद्वारे जोडलं जातं, जेणेकरून तो शिडीवरुन सटकला तरी जमिनीवर पडू नये.
हेही वाचा:
Seema Haider: सीमाच्या चॉईसवर भडकले पाकिस्तानी चाचा; म्हणाले भारतात सुंदर तरुणांची कमी...