Most Expensive Tea in World : चहा (Tea) हे भारतात अतिशय प्रसिद्घ पेय आहे. आपल्या देशात चहाप्रेमींची काही कमी नाही. गरमागरम चहा प्यायल्याशिवाय तर अनेकांच्या चहाची सुरुवात होत नाही. भारतात चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. ही चहा विदेशातही निर्यात केली जाते. साधारणपणे एक किलो चहाची किंमत 400 ते 500 रुपये असते. पण हाच चहा कोट्यवधींना मिळत असेल तर... तुम्ही जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल ऐकलं आहे का? या एक किलो चहाची किंमत कोटींमध्ये आहे. हा चहा पिणं तुम्हा-आम्हा सर्वसाधारण लोकांना मात्र परवडणारं नाही.
जगातील सर्वात महागडा चहा
जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत एक मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सुमारे सात कोटी रुपयांपेक्षांही जास्त आहे. जगातील सर्वात महागडा चहा चीनमध्ये सापडतो. ही चहाची पाती अतिशय दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केली जाते, त्यामुळे या चहाची किंमत जास्त आहे. चीनमधील फुजियान प्रांतामधील वुई पर्वतांवर या चहाची पाने आढळतात. शेवटच्या वेळी 2005 साली या चहाची कापणी करण्यात आली होती.
एक किलो चहाची किंमत कोट्यवधी रुपये
जगातील सर्वात महागड्या या चहाचं नाव 'दा हाँग पाओ' (Da Hong Pao Tea) आहे. या काही ग्राम चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे. 2002 मध्ये हा 20 ग्राम चहा 180,000 युआन म्हणजेच 28,000 डॉलरमध्ये विकला गेला. भारतीय चलनामध्ये याची किंमत सुमारे 23 लाख आहे. हा चहा अतिशय दुर्लभ असल्यामुळे याला चीनने राष्ट्रीय खजाना म्हणून घोषित केलं आहे.
'या' चहाचा इतिहास काय?
'दा हाँग पाओ' चहाची लागवड चीनच्या मिंग राजवंशाच्या काळात सुरू झाली. हा चहा अतिशय खास आहे. चीन कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष चेअरमन माओ यांनी 1972 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना त्यांच्या चीनच्या अधिकृत भेटी दरम्यान 200 ग्रॅम 'दा हाँग पाओ' चहा भेट म्हणून दिला होता. 1849 मध्ये, ब्रिटीश वनस्पतिशास्त्रज्ञ रॉबर्ट फॉर्च्यून माउंट वुईवर गुप्त मोहिमेवर गेले. तेथून त्याही हा चहा भारतात आणला.
बाजारात मिळत नाही 'हा' चहा
जगातील सर्वात महागडा चहा 'दा हाँग पाओ' बाजारात मिळत नाही. हा चहा फक्त लिलावाद्वारे विकत घेता येतो. कारण हा अतिशय दुर्मिळ आहे. हा चहा एका दशकापूर्वी चीनच्या सिचुआनच्या याआन पर्वतांमध्ये एका उद्योजक आणि काही व्यक्तींनी मिळून पहिल्यांदा पिकवला होता. या चहाची 50 ग्रॅमची पहिली बॅच 3,500 डॉलर म्हणजेच सुमारे 3 लाख रुपयांना विकली गेली. यामुळे याला जगातील सर्वात महागहा चहा असं म्हटलं जातं.
एवढं काय खास आहे या चहात?
चिनी लोकांचा असा विश्वास आहे की, त्यावेळी मिंग राजवटीची राणी अचानक आजारी पडली होती. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हा चहा पिण्याचा सल्ला देण्यात आला. हा चहा प्यायल्यानंतर राणी पूर्णपणे बरी झाली. यानंतर राजाने संपूर्ण राज्यात या चहाची लागवड करण्याचा आदेश दिला होता. मिंग राजाच्या लांब झग्यावरून या चहाच्या पानाला 'दा-होंग पाओ' असं नाव पडलं.