Expensive Jacu Bird Coffee : जगभरात चहाप्रेमी (Tea) प्रमाणेच कॉफी (Coffee) प्रेमींची संख्याही फार मोठी आहे. अनेक प्रकारच्या कॉफी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ठिकाणच्या कॉफीची चव आणि किंमतही वेगवेगळी आहे. पण तुम्हाला जगातील सर्वात महाग कॉफीबाबत (World's Most Expensive Coffee) माहिती आहे का? ही कॉफी विकत घेण्याऐवजी तुम्हाला एखादा नवा कोरा आयफोन खरेदी करता येईल, कारण याची किंमत खूप जास्त आहे. इतकंच नाही तर ही जगातील सर्वात महाग कॉफी एका पक्षाच्या विष्ठेपासून तयार केली जाते. ही कोणती कॉफी आहे अन् हा पक्षी कोणता याची माहिती वाचा सविस्तर.


जगातील सर्वात महाग कॉफी जाकू बर्ड कॉफी (Jacu Bird Coffe) नावाने प्रसिद्ध आहे. ही कॉफी जाकू पक्षाच्या (Jacu Bird) विष्ठेपासून तयार केली जाते. जाकू बर्ड कॉफीची किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. ही सर्वात महागडी कॉफी ब्राझीलमध्ये तयार केली जाते. येथूनचं याची जगभरात निर्यात केली जाते.


'या' विचित्र कारणामुळे कॉफी बनवायला झाली सुरुवात


जाकू बर्ड कॉफी तयार करण्यामागे विचित्र कारण आहे. 2000 साली ब्राझीलच्या हेनरिक स्लोपर जी अराउजो या कॉफी बागायत दाराने या कॉफीची सुरुवात केली. त्यांच्या ब्राझीलमधील कॉफीच्या बागेत जाकू पक्षाने धुमाकूळ घातला होता. हे पक्षी त्यांच्या बागेतील कॉफीच्या बिया खायचे, यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला.


जाकू पक्षी ब्राझीलमधील दुर्मिळ पक्षांपैकी एक आहे. त्यामुळे या पक्षाच्या त्रासापासून मुक्तता मिळणे कठीण झाले होते, कारण या पक्षाला दुखापत झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत होती. याच दरम्यान, लुवाक कॉफी प्रचंड चर्चेत आली. ही कॉफी एक प्रकारच्या मांजरीच्या विष्ठेपासून तयार केली जाते.


ब्राझीलच्या हेनरिक स्लोपर जी अराउजो यांनी लुवाक कॉफीपासून एक कल्पना सुचली आणि त्यांनीही जाकू पक्षाच्या विष्ठेपासून कॉफी बनवण्याचा शोध लावला. ही कॉफी चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या ही कॉफी जगातील सर्वात महागडी कॉफी म्हणून ओळखली जाते. 


जाकू बर्ड कॉफी बनवण्याची पद्धत


ही कॉफी बनवण्यासाठी सगळ्यात आधी जाकू पक्ष्याची विष्ठा शोधतात आणि नंतर त्यामधून कॉफीच्या बिया वेगळ्या केल्या जातात. या बिया स्वच्छ केल्या जातात, त्यानंतर त्या बीन्स व्यवस्थित वाळवल्या जातात. कॉफीच्या बिया सुकल्यानंतर त्या भाजून त्यांची पावडर तयार केली जाते. हे संपूर्ण काम हातांनी केले जाते, म्हणूनच ही कॉफी इतकी महाग विकली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Venom : कोब्रा नाही... 'या' विंचूचं विष आहे सर्वात महाग; शरीरात गेल्यास होतील असह्य वेदना