मुंबई : पाणी (Water) हेच जीवन आहे. पाण्यावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून आहे. पाण्याचे नवनवीन साठे शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मानव अगदी अंतराळात पोहोचला आहे. इतर ग्रहांवर पाणी उपलब्ध आहे की नाही हे शोधण्यासाठी जगभरातील देश कोट्यवधी रुपये खर्च करुन इतर ग्रहांबाबत संशोधन करत आहेत. भारतही चांद्रयान-3 द्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचा मर्यादित साठा
पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली ही अमूल्य देणगी आहे. मानवासाठी हवेप्रमाणेच पाणीही अतिशय आवश्यक आहे. आपण पाणी विकत घेऊ शकतो. मात्र, ते तयार करु शकत नाही. दरम्यान, मानवाकडून पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पृथ्वीवरील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात आहे. पण, त्यापैकी पिण्यायोग्य पाणी फारच मर्यादित आहे. पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे मर्यादित साठे आहेत.
वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंदे यामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, पृथ्वीवरील पाणी संपलं तर काय होईल? याचं उत्तर जाणून घेऊया.
पृथ्वीवरील पिण्याचं पाणी संपलं तर काय होईल?
पाण्याच्या कमतरतेमुळे पृथ्वी ग्रहावरही परिणाम होईल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॅलिफोर्नियाची इम्पीरियल व्हॅली आहे. येथे गेल्या 100 वर्षांत भूजलाच्या पातळीत सातत्याने घट झाली आहे, यामुळे येथील जमीन 100 फूट खाली गेली आहे. भूगर्भातील पाणी शोषून काढल्यामुळे तेथे पाण्याच्या कमतरता निर्माण होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे भूभाग कमी होण्याबरोबरच भूकंपाचा धोकाही वाढू शकतो, असा अंदाज पर्यावरण शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. पृथ्वीचे कवच हलकं होत आहे. यामुळे भूकंप होण्याचा धोका वाढू शकतो.
पाण्याअभावी जग संकटात?
एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, मानवांसाठी जगभरातील पाणीटंचाईचे परिणाम मोठी आपत्ती ठरेल. 1995 मध्ये जागतिक बँकेचे उपाध्यक्ष इस्माईल सेरागेल्डिन यांनी भाकीत केलं होतं की, भविष्यात पाण्यामुळे युद्ध होईल. युनायटेड स्टेट्समध्ये आताच पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे, तिथे 35 राज्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येशी लढत आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासा (NASA) यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाण्याचा साठा वाढवण्यासाठी समुद्रातील पाणी प्रक्रिया करुन पिण्यायोग्य करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :