मुंबई : सध्या देशभरात सनातन धर्म (Sanatan Dharma) या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टालिन (Udhayanidhi Stalin) यांच्या वक्तव्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M K Stalin) यांचे चिरंजिव आणि मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद पेटला. उदयनिधी स्टालिन यांनी म्हटलं की, सनातन धर्म वाईट आहे. ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया वाईट असल्यामुळे त्यांना नष्ट करणं गरजेचं आहे. त्याप्रमाणेच सनातन धर्मही नष्ट करायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून टीका केली जात आहे. पण, आता या चर्चांमुळे प्रश्न उपस्थित होतो की, सनातन धर्म म्हणजे काय, सनातन धर्माचा अर्थ काय आणि हा कधीपासून अस्तित्वात आहे.


सनातन धर्म केव्हापासून अस्तित्वात आहे?


सनातन धर्म हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. सनातन धर्म हा हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म या नावानंही ओळखलं जातं. सनातन धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म असल्याचं मानलं जातं. भारताच्या सिंधू घाटीमधील सभ्यतेमध्ये सनातन धर्माचं अस्तित्व पाहायला मिळतं. सनातन धर्माचं अस्तित्व नेमकं किती वर्षांपासून आहे, हे जाण्याचा प्रयत्न केला तर, त्याबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. काही दाव्यांनुसार सनातन धर्म 12 हजार वर्ष जुना आहे. तर, काही दाव्यांनुसार, सनातन धर्म सुमारे 90 हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं.


हिंदू शब्द कुठून आला?


हिंदू शब्द नेमका कुठून आणि कसा आला, याबाबत एक कहाणी प्रचलित आहे. त्यानुसार, जेव्हा तुर्कस्तानी आणि इराणी लोक भारतात आले, तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातून भारतात प्रवेश केला. सिंधू एक संस्कृत शब्द आहे. तुर्की आणि इराणी भाषेत 'स' शब्द नाही, त्यामुळे ते 'सिंधू' शब्दाचा योग्यप्रकारे उच्चार करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून 'सिंधू' शब्दाचा अपभ्रंश 'हिंदू' असा झाला. त्यासोबतच त्यांची येथे राहणाऱ्या लोकांना हिंदू बोलण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हिंदुंचा देश म्हणून हिंदुस्तान असं देशाचं नाव पडलं, असं सांगितलं जातं.


सनातन म्हणजे काय?


हिंदू धर्मातील कट्टरवाद्यांना सनातनी म्हटलं जातं. प्राचीन हिंदू धर्मातील रुढी, परंपरांचे पालन करत असल्याचा दावा सनातनी धर्मिय करतात. सनातनी लोक हे हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थेचे पालन करतात. सनातन हा हिंदू धर्मातील प्राचीन पद्धतींचं पालन करणारा वर्ग आहे. सनातन हा शब्द 'सत्' आणि 'तत्' मिळून बनलेला आहे, याचा अर्थ 'हे' आणि 'ते'. सनातन म्हणजे ज्याची सुरुवात आणि अंत नाही. तसेच ज्यामध्ये कोणताही बदलही होत नाही.