Viral: काही जण आपल्या माणसांबाबत, प्राण्यांबाबत तसेच आपल्या वस्तूंबाबत इतके संवेदनशील असतात की, त्यापैकी एकही गोष्ट गमावली, तर अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. एका कुटुंबाने चक्क आपल्या आवडत्या कारवर अंत्यसंस्कार करत ती जमिनीत पुरली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कुटुंबियानी या कारला चक्क भाग्यलक्ष्मी म्हटलंय. याचं कारण काय? नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जाणून घ्या..


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


अनेकदा गाडी बिघडली तर आपण ती दुरुस्त करून देतो, खराब असेल तर ती विकतो, पण गुजरातमधील एका कुटुंबाने असे काही न करता खड्डा खोदून गाडी पुरली. एवढंच नाही तर अंत्यविधी पार पडला. या कारच्या अखेरच्या प्रवासात दीड हजार लोक सहभागी झाले आणि त्यानंतर अखेरचा निरोप देण्यात आला. हे प्रकरण गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील आहे. लाठी तालुक्यातील पदरशिंगा गावात संजय पोलारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या कारच्या अंतिम संस्कारासाठी संत आणि अध्यात्मिक लोकांसह सुमारे 1,500 लोक उपस्थित होते. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पोलारा आणि त्याचे कुटुंब त्यांच्या शेतात विधी करताना दिसत आहेत. 






गाडी जमिनीत का दफन करण्यात आली?


संजय पोलारा यांचे कुटुंब शेती करतात. वॅगन आर कार 12 वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली होती. ही कार शेतकरी कुटुंबासाठी भाग्यवान ठरली आणि त्यांनी तिला "भाग्यवान" गाडी असे मानण्यात आले. त्यामुळेच ही कार विकण्याऐवजी किंवा भंगारात देण्याऐवजी त्यांनी पूर्ण विधी करून अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारासाठी गाडी फुलांनी आणि हारांनी सजवली होती आणि पोलाराच्या घरापासून त्याच्या शेतापर्यंत मोठ्या थाटामाटात अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर गाडी कापडाने झाकण्यात आली आणि मग कुटुंबीयांनी पूजा केली, मंत्रोच्चारांसह गाडीवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर माती टाकून गाडी पुरण्यात आली.


कुटुंबासाठी भाग्यवान ठरली कार!


संजय पोलारा म्हणाले की, मी ही कार सुमारे 12 वर्षांपूर्वी खरेदी केली होती आणि त्यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी आली. व्यवसायात यशाबरोबरच माझ्या कुटुंबालाही मान मिळाला. ही कार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरली. त्यामुळे ती विकण्याऐवजी मी श्रद्धांजली म्हणून आमच्या शेतात पुरली. येणाऱ्या पिढ्यांना याची माहिती मिळावी यासाठी समाधी स्थळी वृक्षारोपणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


 


हेही वाचा>>>


Viral: 'सण प्रत्येकासाठी सारखेच नसतात!' दिवाळीत डिलिव्हरी बॉयने तब्बल 6 तास काम केलं, पण कमाई पाहाल तर डोळे भरून येतील


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )