Parents Leave Baby at Airport in Israel : कोणत्याही प्रवासात पालक आपल्या मुलांची विशेष काळजी घेताना दिसतात. विशेषत: मुलं लहान (Baby) असेल तर काळजी जास्त असते. पण नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका जोडप्याचा तिकीटावरून विमानतळ प्रशासनासोबत वाद झाला. यानंतर या जोडप्याने बाळाला चेक-इन काउंटरवर सोडून दोघे विमान प्रवासासाठी पुढे निघून गेले.


बाळाला चेक-इन काऊंटर वरच सोडलं


एका जोडप्याने फ्लाईट पकडण्यासाठी चक्क स्वत:च्या पोटच्या मुलाला विमानतळाच्या तिकीट काऊंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालकांनी बाळाचे विमान प्रवासाचे तिकीट काढले नव्हते. ही घटना इस्त्राइलमध्ये घडली आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे बेल्जियन पासपोर्टवर ब्रसेल्सला जात होते. या जोडप्याने बाळासाठी फ्लाईट तिकीट खरेदी केले नव्हते. विमानतळ कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याने बाळाला काऊंटर जवळचं ट्रॉलीमध्ये सोडले आणि फ्लाईट पकडण्यासाठी चेक-इन गेटमधून आत शिरले.


जोडप्याने बाळाचे तिकीट काढलं नव्हतं


सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याने फक्त त्या दोघांचे तिकीट काढले होते. त्यांनी बाळासाठी वेगळे तिकीट काढले नव्हते. चेक-इन काऊंटवर तिकीटावरून या जोडप्याचा विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर जोडप्याने आपल्या मुलाला इस्रायल विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडले. रिपोर्टनुसार, ही घटना तेल अवीव बेन-गुरियन विमानतळ रायनायर येथे घडली आहे. हे जोडपे बाळाचे तिकीट न काढताच फ्लाइटमध्ये प्रवास करण्याच्या प्रयत्नात होतं.


बाळाचे तिकीट खरेदी करण्यास जोडप्याचा नकार


मीडिया रिपोर्टनुसार, बेल्जियन पासपोर्टवर ब्रुसेल्सला जाणाऱ्या या जोडप्याने बाळाचे तिकीट खरेदी केले नव्हते. विमानतळ कर्मचार्‍यांनी सांगितले की, विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी जोडप्याला सांगितले की, त्यांना बाळासाठी वेगळे तिकीट खरेदी करावे लागेल, कारण त्यांनी बाळाचे तिकीट काढले नव्हते. पण जोडपं बाळाचे तिकीट काढण्यासाठी तयार नव्हतं. यावरून जोडप्याने कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. त्यानंतर त्यांनी बाळाला चेक-इन डेस्कजवळ बाळाला ट्रॉलीमध्ये सोडलं आणि पासपोर्ट चेकींगनंतर फ्लाईट पकडण्यासाठी पुढे गेलं.


एजंटने विमानतळ सुरक्षा विभागाची संपर्क साधला


सीएनएनला दिलेल्या निवेदनात, एअरलाइन सांगितले की, '31 जानेवारी रोजी तेल अवीव ते ब्रुसेल्स प्रवास करणाऱ्या या प्रवासी जोडप्याने त्यांच्या बाळाशिवाय चेक-इन केले. त्यांनी बाळाला चेक-इन काऊंटरवरच सोडलं आणि पुढे निघून गेले. यानंतर चेक-इन एजंटने चेक-बेन गुरियन विमानतळावरील विमानतळ सुरक्षा विभागाशी संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनात ही बाब आणली. यानंतर विमानतळ प्रशासनाने फ्लाईट पकडण्याआधी या जोडप्याला ताब्यात घेतलं आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं.