वाराणसी : सध्याचा काळ हा डिजिटल मीडियाचा आणि सोशल मीडियाचा (Social media) असून सगळ्यांना रिल्सचं याड लागलंय. गावागावात रिल्सस्टार आणि रिल्स बनवून व्हायरल करणारे, दिखावा करणारे उदयास येत आहेत. अनकेदा कुणी रिल्सच्या माध्यमातून दादागिरी करते, तर कुणी रिल्सच्या माध्यमातून स्टंट करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे. वाहनांवर फालतू स्टंट केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्वयंघोषित रील्सटार किंवा स्टंटबाजांना पोलिसांनी आपला हिसकाही दाखवला आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या (UP) हापुड येथे असाच चारचाकी गाडीवर स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी आपला इंगा दाखवला आहे. चारचाकी वाहनावर स्टंट करणाऱ्या या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वत:सह इतरही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हा ड्रायव्हिंग करत होता. 

Continues below advertisement


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा युवक जीवघेणा स्टंट करत होता, धावत्या चारचाकी गाडीवर उभे राहून तो स्ंटट करताना दिसून येतो. विशेष म्हणजे वॅगनआर कारचे स्टेअरिंग सोडून तो धावत्या कारमध्ये खिडकीत उभा राहतो. दुसरीकडे त्याचे मित्र त्याच्या ह्या कृत्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना असल्याचे सांगण्यात येते. 


जनपद हापुड येथील पिलखुआ तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 9 वरील युवकाने आपला जीव धोक्यात घालत हा व्हिडिओ शूट केल्याचं पाहायला मिळत आहे. नशिबाने हा व्हिडिओ शूट करताना संबंधित युवकासोबत कुठलाही अपघात घडला नाही, किंवा या वाहनाकडून इतर वाहनाला कुठलीही इजा झाली नाही. मात्र, पोलिसांनी या युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, कारण स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या या युवकाने इतरही प्रवाशांची जीव धोक्यात घातल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून वॅगनर कारचालकाला मोठा दंड बसवला आहे. एमव्ही अॅक्टनुसार, कारवाई करत पोलिसांनी कारमालकाच्या नावाने 36,000 रुपयांचे चालान (दंडाची पावती) फाडले आहे. तसेच, वाहतूक सुरक्षित नियमांचे पालन करावे आणि रिल्स बनवताना किंवा सोशल मीडियावरील स्टंटसाठी असे व्हिडिओ बनवू नयेत, असे आवाहनही हापुड पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 


हेही वाचा


पंढरपूरला येणाऱ्या एसटी बस अन् ट्रकची धडक; भीषण अपघातात 16 प्रवासी जखमी, 6 जण गंभीर