Belgium Girl Married Indian Auto Driver : कोण कधी आणि कुठे कुणाच्या प्रेमात पडेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक सातासमुद्रापारची लव्ह स्टोरी सध्या समोर आली आहे. ही प्रेमकहाणी आहे कर्नाटकातील अनंत राजू आणि बेल्जियमची कॅमिल यांची प्रेमकहाणी.  बेल्जियममधील 27 वर्षीय कॅमिली 30 वर्षीय टुरिस्ट गाईड अनंत राजूच्या प्रेमात पडली. राजूच्या प्रेमात पडल्यानंतर कॅमिली बेल्जियमहून भारतात पोहोचली आणि दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधली.


राजू आणि कॅमिली दोघांची भेट कोविड साथीच्या आजारापूर्वी हम्पीमध्ये झाली होती. कॅमिली आपल्या कुटुंबासह हम्पीला फिरायला आली तेव्हा अनंत राजूने त्यांचा गाईड होता. राजूने केमिलीला शहरभर फिरवून इतिहासाशी निगडीत माहिती तर दिली. शिवाय त्यांच्या एका चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली. काही दिवसांच्या या भेटीनंतर कॅमिली तिच्या कुटुंबासह बेल्जियमला ​​परतली.


ओळखीचं रुपांतर मैत्री आणि मग प्रेमात


राजू आणि कॅमिली एकमेकांपासून दूर गेले पण सोशल मीडियाद्वारे ते एकमेकांशी जोडलेले होते. दोघेही तासनतास सोशल मीडियावर गप्पा मारायचे. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी ही गोष्ट आपापल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाला संमती दिली आणि लग्नासाठी तयार झाले.


कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू झाल्याने कॅमिली बेल्जियममधून भारतात येऊ शकली नाही. निर्बंध उठल्यावर कॅमिली बेल्जियमहून अनंत राजूसाठी भारतात पोहोचली. दोघांनी 25 नोव्हेंबरला हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं.


पहिल्या नजरेत जडलं प्रेम


कॅमिलीने सांगितले की, 'राजूने तिला आणि तिच्या कुटुंबाला टूरवेळी खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. तो मला फार प्रामाणिक आणि दयाळू वाटला आणि मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले. माझ्या देशात परतल्यानंतरही मी त्याचाच विचार करायचे. पण कोरोनामुळे आम्ही पुन्हा भेटू की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं. पण आज आम्ही एकत्र आहोत आणि आता आम्ही पती-पत्नी आहोत, आम्ही खूप आनंदी आहोत.'


अनंतराजू यांनी सांगितले की, कॅमिल 2019 मध्ये तिच्या आई-वडील आणि भावंडांसोबत हम्पीला आली होती. त्याच्या राहण्याची आणि प्रवासाची पूर्ण व्यवस्था मी केली होती. ते माझ्या व्यवस्थेवर खूश होते आणि निघताना कॅमिलीने मला वचन दिले की ती पुन्हा हम्पीला भेट देईल. त्याने दिलेले वचन पाळले. काही दिवसांतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि मी कॅमिलला माझी पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला होता, असेही अनंतराजू म्हणाले. प्रेमाला सीमा नसते हे माझ्या लग्नाने सिद्ध केले आहे.