Doctors Coat Fact : प्रत्येक व्यवसायाची स्वतःची खास ओळख असते. डॉक्टर (Doctor) हा शब्द ऐकल्यावर मनात पहिलं येणारं चित्र म्हणजे डॉक्टरांचा पांढरा कोट. डॉक्टर म्हटलं की आपल्याला पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेली व्यक्ती. लहानपणापासून तुम्हीही पाहात आलं असाल की, डॉक्टर किंवा वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे कपडे बहुतेक वेळा पांढऱ्या रंगाचे असतात.

डॉक्टर पांढऱ्या रंगाचा कोट का वापरतात?

तुम्ही कधी विचार केला आहे का की डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नेहमी पांढरे कोट का घालतात? त्यांच्या कोटचा रंग लाल, पिवळा, निळा किंवा इतर कोणताही का नसून पांढराच का असतो? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल आणि तुम्हाला यामागचं कारण माहित नसेल तर आम्ही आज तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत

पांढरा कोट वैद्यकीय व्यवसायाचं प्रतीक

डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या कोटचा रंग पांढरा असतो. याचा थेट संबंध रुग्ण आणि त्यांच्या सुरक्षिततेशी आहे. एका अहवालानुसार, डॉक्टर किंवा वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी पांढऱ्या रंगाचा कोट 19व्या शतकापासून वापरला जाऊ लागला. हे वैद्यकीय व्यवसायाचं प्रतीक मानले जातं. शिवाय याचा संबंध रुग्ण आणि त्या स्वच्छतेशी आहे. तसेच पांढरा रंग लक्ष वेधून घेतो. रुग्णालय हे गर्दीच्या ठिकाणांपैकी एक आहे. रुग्णालयात गर्दीच्या वेळी रूग्णांनी खचाखच भरलेल्या रूग्णालयाच्या आवारात तुम्ही पांढरऱ्या रंगाचा कोट घातलेले डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सहज ओळखू शकता. यामुळे डॉक्टरांच्या कोटसाठी पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो.

पांढऱ्या रंगाच्या कोटचा संबंध रुग्णाच्या सुरक्षेशी

डॉक्टरांच्या पांढऱ्या रंगाच्या कोटचा संबंध रुग्णाच्या सुरक्षेसोबतही आहे. पांढऱ्या रंगाच्या कोटवर कोणत्याही प्रकारचे डाग सहज दिसतात. डॉक्टरांचं मूळ काम रुग्णावर उपचार करणे, हे असतं. डॉक्टर विविध रोगांची लागण झालेल्या रुग्णांना भेटून त्यांच्यावर उपचार करतात. डॉक्टरांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना भेटावं लागतं आणि अनेकवेळा जखमी रुग्णांवर उपचारही करावे लागतात. अशा वेळी डॉक्टरांचा विविध रोगांच्या विषाणूंसोबत संपर्क येतो. डॉक्टरांच्या मार्फत एका रुग्णाकडून विषाणू दुसऱ्या विषाणू संक्रमित होण्याची शक्यता असते. 

पांढर्‍या रंगाच्या कोटवर डाग, रक्त किंवा रक्ताच्या खुणा सहज दिसतात. दुसऱ्या रंगांच्या कोटवर कोणतेही डाग स्पष्टपणे दिसत नाहीत, पण पांढऱ्या रंगावर कोणताही जाग पटकन दिसण्यात येतो. त्यामुळे डॉक्टरांचा कोट अस्वच्छ असल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे डॉक्टर दुसऱ्या रुग्णावर उपचार करण्याआधी हा कोट बदलू शकतात. त्यामुळे रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि धोका कमी होतो. म्हणूनच डॉक्टरांच्या कोटचा रंग पांढरा असतो.