Ganesh Chaturthi 2022 : सध्या देशात गणेशात्सावामुळे मंगलमय वातावरण आहे. भक्तगण भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कुठे घरगुती तर कुठे सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या गणपत्ती बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे. मुंबईसह देशात अनेक प्रसिद्ध गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची रिघ लागल्याचं दिसत आहे. असंच एक राजस्थान मंदिर सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या गणेश मंदिरात प्रेमींची इच्छा पूर्ण होते, असं म्हटलं जातं. राजस्थानमधील इश्किया गणेश मंदिर प्रेम करणाऱ्या जोडप्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे.


राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील इश्किया गणेश मंदिर (Ganesh Ishkiyan Temple) अतिशय प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी विशेषत: श्री गणेश चतुर्थीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे दरवर्षी मोठी जत्रा भरते. येथे हजारो प्रेमी त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या इच्छेने बाप्पाचं दर्शन घेतात. इश्किया मंदिराबाबत खास गोष्टी जाणून घ्या.



इश्किया गणेश मंदिराला 100 वर्षांचा इतिहास


इश्किया गणेश मंदिर जोधपूरमध्ये आहे. येथे राहणारे लोक सांगतात की, या मंदिराला सुमारे 100 वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराची स्थापना गुरु गणपती मंदिर म्हणून करण्यात आली. आज ते 'इश्किया गणेश मंदिर' नावानं प्रसिद्ध आहे. इथे दररोज मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात.


अविवाहितांची लग्नाची इच्छा पूर्ण होते.


या मंदिराबाबत असा समज आहे की, जर कोणी अविवाहित असेल आणि त्या व्यक्तीने इश्किया मंदिरात येऊन पूजा केली तर त्याचं लग्न लवकर होतं. लग्नाच्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात. गणपती भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो.




 
इश्किया गणेश मंदिर हे नाव कसं पडलं?


येथील स्थानिक लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हे मंदिर अशा ठिकाणी होते जिथे लोकांची वर्दळ कमी होती. त्यामुळे या मंदिरात प्रेमीयुगुल कुणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून येथे गुपचूप भेटायला येत असत. कालांतराने येथे प्रेमी युगुलांची गर्दी होऊ लागली आणि गणपती बाप्पांच्या आर्शिवादाने अनेकांच्या लग्नाची मनोकामना पूर्ण झाली. म्हणून याला इश्किया गणेश मंदिर असं म्हटलं जाऊ लागलं. येथे दर बुधवारी जत्रा भरते.


महत्त्वाच्या इतर बातम्या