Kinchit Shah Propose Girlfriend : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं हाँगकाँगचा पराभव करत आशिया चषकात सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. पराभवानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांची जेवढी चर्चा झाली.. तेवढीच चर्चा हाँगकाँगच्या एका खेळाडूची झाली. सामना गमावला पण हाँगकाँगच्या खेळाडूनं प्रेयसीचं मन जिंकलं... होय... भारतविरोधातील सामन्यानंतर हाँगकाँगच्या खेळाडूनं प्रेयसीला प्रपोज केलं होतं. प्रेयसीनेही त्याला हो... म्हटलं... हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 
 
हाँगकाँग संघातील किंचित शाह या खेळाडूने त्याच्या प्रेमाला मात्र जिंकलं आहे. किंचितने सामन्यानंतर स्टेडियममध्येच आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. विशेष म्हणजे किंचितला त्याच्या प्रेयसीने होकारही दिला. किंचितच्या या अनोख्या प्रपोजमुळे आजचा सामना चांगलाच अविस्मरणीय ठरला.


पाहा व्हायरल व्हिडीओ.... 






भारताने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलगात करताना हाँगकाँगची सुरुवात समाधानकारक झाली. पण त्यानंतर डाव कोसळला होता. पण त्यावेळी किंचित शाहने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. किंचितने 28 चेंडूत 30 धावांची खेळी केली. हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव झालाय.  


भारताची सुपर-4 मध्ये धडक
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आशिया चषक 2022 मध्ये 'अ' गटातील दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं हाँगकाँगसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात हाँगकाँगनं शेवटपर्यंत झुंज सुरू ठेवली. पण निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावून 152 धावाच करू शकला. हाँगकाँगकडून बाबर हयातनं सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


सूर्यकुमार यादव, विराट कोहलीची दमदार फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं पॉवरप्लेमध्ये एक विकेट्स गमावून 44 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 13 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला. केएल राहुलनंही (KL Rahul) अतिशय संथ खेळी केली. तो 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीनं भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवनं अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. ज्यात सहा षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, विराट कोहलीनंही अर्धशतक झळकावलं. त्यानं 44 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं तीन चौकार आणि एक षटकार लगावलाय. हाँगकाँगकडून मोहम्मद जहाफर आणि आयुष शुक्लाला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे