Ganesh Chaturthi 2022 : श्रावण महिना सुरु झाला की, भारतात विविध सणांची चाहूल लागते. आता लवकरच श्री गणेशाचं अर्थात आराध्यदैवत असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. श्री गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2022) उत्साह केवळ भारतातच नाहीतर जगभरात पाहायला मिळतो. भारतात श्री गणेश चतुर्थीला गणपतीच्या आगमनापासून अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनापर्यंत चालणारा अकरा दिवसांच्या या जंगी उत्सवाची मजा काही वेगळीच असते. जगभरातील पर्यटक देशातील गणेशोत्सवाची मजा घेण्यासाठी भारतात येत असतात. भारतात अनेक प्रसिद्ध गणपती मंदिरं आहेत. जिथे तुम्ही एकदा तरी नक्की जायला हवं. मुंबई, पुणे, जयपूरसह देशात कोणती प्रसिद्ध मंदिरं आहेत जाणून घ्या,


1. सिद्धिविनायक मंदिर, मुंबई (Siddhivinayak Temple, Mumbai)


मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणजे सिद्धीविनायक. सिद्धिविनायक मंदिर प्रत्येक गणेश भक्ताचं श्रद्धास्थान आहे. अगदी सामान्य माणसांपासून मोठ-मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर 18 व्या शतकात 1801 मध्ये बांधलं गेलं. हे मंदिर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिराला ‘नवसाचा गणपती’ असंही म्हटलं जाते. हे मंदिर लक्ष्मण विठू पाटील यांनी बांधलं. यासाठी देउबाई पाटील नावाच्या एका निपुत्रिक महिलेनं निधी दिला होता, त्यांची इच्छा होती की देवानं इतर स्त्रियांना मुलं द्यावी, अशी अख्यायिका आहे. 




2. दगडूशेठ गणपती, पुणे (Dagdusheth Halwai Ganpati Temple, Pune)
दगडूशेठ गणपती मंदिराला शतकाहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास आहे. ही मूर्ती 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद मूर्ती सुमारे आठ किलो सोन्याने सजलेली आहे. 1800 च्या उत्तरार्धात, दगडूशेठ गडवे एक मिठाई विक्रेते आणि एक श्रीमंत व्यापारी यांनी प्लेगच्या साथीने आपला मुलगा गमावला. यामुळे दगडूशेठ आणि त्यांची पत्नी नैराश्यात गेले. नैराश्यातून मुक्त होण्यासाठी त्यांचे गुरू श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांना गणेश मंदिर बांधण्यास सांगितलं. 1893 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. समाजसुधारक लोकमान्य टिळक हे दगडूशेठ यांचे जवळचे मित्र होते आणि इथेच गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना टिळकांच्या मनात आली. त्यानंतर येथील गणपती मंदिर प्रसिद्ध झालं.




3. गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी (Ganpatipule Temple, Ratnagiri)
गणपतीमुळे मंदिराला पुरातन परंपरा आहे. येथील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून 400 वर्षे जुनी असून पश्चिमेकडे तोंड असलेली आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळात सूर्यप्रकाश थेट मूर्तीवर पडेल अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. गणेशभक्त टेकडीभोवती प्रदक्षिणा घालतात. हे मंदिर समुद्र किनारी वसलं आहे.




4. खजराना गणेश मंदिर, इंदोर (Khajrana Ganesh Mandir, Indore)
मध्य प्रदेशातील इंदूर येथील खजराना मंदिराला विशेष महत्त्व आहे. हे मंदिर मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. खजराना मंदिरात गणेशाची तीन फुटी मूर्ती आहे. ही मूर्ती जवळच्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली.




5. डोडा गणपती मंदिर, बंगळुरु (Dodda Ganapati Temple, Bangalore)
बंगळुरूपासून 13 किमी अंतरावर बसवनगुडी परिसरात असणारं डोडा गणपती मंदिर फार प्रसिद्ध आहे. दोडा गणपतीच्या मंदिराचं नातं गौडा राज्यकर्त्यांशी जोडलेलं आहे. हे मंदिर सुमारे 500 वर्षांपूर्वी बांधले गेल्याचं मानलं जातं. या मंदिरामध्ये श्री गणेशाची 18 फूट उंचीची मूर्ती आहे.




6. वरसिद्धि विनयगर मंदिर, चेन्नई (Varasiddhi Vinayagar Temple, Chennai)
चेन्नईमधीलबेसंत नगर भागात असलेले वरसिद्धि विनयगर मंदिर भाविकांचं मोणं श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी भव्य गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं. या मंदिरात गरिबांसाठी मोठा भंडारा आयोजित केला जातो. मंदिरात सामाजिक कार्याला विशेष महत्त्व दिलं जातं. 




7. मोती डूंगरी गणेश मंदिर, जयपूर (Moti Dungri Ganesh Ji Temple, Jaipur)


जयपूरमधील प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिर सतराव्या शतकात बांधलं गेलं. किल्ले आणि टेकड्यांच्या मध्यभागी वसलेलं हे मंदिर राजस्थानातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील गणेशमूर्ती सुमारे पाचशे वर्षे जुनी आहे.