पुणे : सध्याच्या काळात नोकरी (Job) लागणं जेवढं बनलंय, तेवढंच नोकरीचा राजीनामा देणंही अवघड बनलं आहे. घर, संसार आणि इतर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली इच्छा नसतानाही दररोज 8 तासांची नोकरी करावी लागते. अनेकजण नोकरीत समाधानी नसतात, तरीही आर्थिक गरज भागविण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, कुटंबांसाठी (Family) नोकरी करावीच लागते. नोकरीच्या ठिकाणी बॉसचे ताणेबाणे खाऊन, काहीवेळा अपमान सहन करुनही नोकरी टिकवावी लागते. मात्र, एका युवकाने नोकरी सोडल्याचा आनंद धुमधडक्यात साजरा केला. विशेष म्हणजे, नोकरी सोडल्यानंतर ऑफिसमध्ये ढोलताशा वाजवत डान्सही केला.


पुणे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबादसारख्या महानगरांमध्ये आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी असतात. त्यामुळे, येथील नोकरी करणारे तरुण सातत्याने जॉब चेंज करतात. काहीजण कंपनीतील वातावरण पूरक नसल्याने, काहीजण पगार कमी असल्याने, काहीजण बॉसच्या कटकटीमुळे नोकरीचा राजीनामा देतात. आता पुण्यातील अशाच एका कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला असून कंपनीतील शेवटचा दिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. सध्या, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


अनिश भगत या इंस्टाग्राम युजर्सने सोशल मीडियावर अनिकेतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, अनिकेतने आपल्या नोकरी सोडण्याचे कारण सांगितले आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून कंपनीत नोकरी करत होतो. मात्र, गेल्या तीन वर्षात केवळ काही प्रमाणात माझ्या पगारात वाढ झाली. तसेच, कंपनीत काम करताना बॉसकडूनही आदर, सन्मान मिळत नव्हता. त्यामुळे, मी नोकरी सोडल्याचे अनिकेतने सांगितले. अनिकेतच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्याचे सहकारी मित्र एकत्र आले. विशेष म्हणजे त्यांनी कंपनीच्या कार्यालयाबाहेरच ढोल-ताशा आणला होता. कंपनी कार्यालयाबाहेरील हे दृश्य पाहून अनिकेतचा बॉस संतप्त झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसेच, ढोल-ताशा वाजवत कार्यालयात येऊ पाहणाऱ्या अनिकेतच्या मित्रांना बाहेर ढकलत असल्याचेही दिसते. 






व्हिडिओ तुमच्यासोबत साधर्म्य दर्शवणारा


दरम्यान, अनिश भगतने व्हिडिओसोबत कॅप्शन दिले आहे. ''हा प्रसंग अनेकांशी साधर्म्य आहे, असे मला वाटते. आजकाल टॉक्सिक वर्क कल्चर सर्वत्र दिसून येते, जिथे आदर नसणे आणि आपल्या हक्कांवर गदा आणली जाते. अनिकेत आज त्याच्या आयुष्यातील पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. त्यामुळेच, अनिकेतची कथा लोकांना प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे", अशा शब्दात अनिशने 
अनिकेतच्या नोकरी सोडण्याचं समर्थन केलं आहे. 


हेही वाचा


Pune Accident : पुण्यातील एम.जी रोडवर अपघात, आलिशान गाडीने 7 ते 8 गाड्या उडवल्या!