Viral News: पाकिस्तानातील (Pakistan ) इस्लामाबाद येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपरमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की, ते पाहून धक्काच बसेल. येथे इंग्रजीच्या पेपरमध्ये भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधावर अश्लील प्रश्न विचारण्यात आला आहे. वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः या प्रश्नावर त्यांचे अभिप्राय देण्यास सांगितले. हे प्रकरण वाढल्यानंतर शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना भविष्यात कोणत्याही संस्थेत काम करता येऊ नये, म्हणून ब्लॅक लिस्टेडही करण्यात आलं आहे. हे प्रकरण अलीकडचे नसून डिसेंबर 2022 चे आहे. या परीक्षेच्या पेपरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर यावरून लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या संदर्भात अनेक नेत्यांनी वक्तव्यंही केली आहेत.


काय आहे प्रकरण? 


समोर आलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील बीएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील इंग्रजी शिक्षकाने 6 डिसेंबर रोजी अचानक एक परीक्षा आयोजित केली. परीक्षेच्या पेपरमधील एका उताऱ्यात एका फ्रेंच भाऊ आणि बहिणीबद्दल सांगण्यात आले आहे, जे आपली उन्हाळ्याची सुट्टी सोबत घालवत असताना एकमेकांच्या जवळ येतात आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. या उतार्‍याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, "याबद्दल तुमचे काय मत आहे?" दोघांमध्ये संबंध असणे योग्य आहे का? हा प्रकार विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक होता. परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडे याप्रकरणी तक्रार पाठवण्यात आली. तपासाअंती 5 जानेवारीला त्या शिक्षकाला काढून टाकण्यात आले आणि त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले, जेणेकरून त्याला इतर कोणत्याही संस्थेत काम करता येऊ नये. 






या प्रकरणी विद्यापीठाने काय म्हटलं? 


विद्यापीठाचे अतिरिक्त कुलसचिव नावेद खान यांनी सांगितले की, तपासात शिक्षकावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. नावेद खानच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने तपासादरम्यान आपल्या बचावात सांगितले की, त्याने घाईघाईने उतारा कॉपी-पेस्ट केला होता. वेळ कमी असल्याने त्याने ते वाचलं नव्हतं. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने विद्यापीठालाही याप्रकरणी समन्स बजावले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या वतीने आरोपी शिक्षकावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


विद्यापीठाच्या कारवाईनंतरही आता या प्रकरणाने पेट घेतला आहे. हे प्रकरण सोशल मीडियापासून पाकिस्तानी संसदेपर्यंत उपस्थित करण्यात आले आहे. पाकिस्तानी खासदार मुश्ताक अहमद खान यांनीही संसदेत शिक्षकाच्या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी केली. यासोबतच विद्यापीठाने चौकशी सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले. मुश्ताक अहमद खान पुढे म्हणाले की, ही बाब म्हणजे आपल्या धर्म आणि मूल्यांवर हल्ला आहे. त्याचबरोबर इम्रान खानचे पीटीआय खासदार झरक तैमूर यांनीही चौकशीची मागणी केली आहे.