Navratri 2023 Recipes: यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवास (Navratri 2023) सुरुवात झाली आहे. ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते, त्या नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. या दरम्यान अनेकांचे 9 दिवसांचे उपवास सुरू होतात. काही जण केवळ फलाहार करणं पसंत करतात, तर काही जण वेगवेगळ्या फराळी पदार्थांचा आस्वाद घेतात. अशा वेळी उपवासाचा खायचं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर दोन्ही पद्धतीने उपवास करणाऱ्यांसाठी आज एक खास केळीच्या खिरीची रेसिपी पाहूया. 


केळीची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य



  • 1 ते 2 केळी

  • 3 कप दूध

  • केशर

  • चवीनुसार गूळ किंवा साखर

  • 8 ते 10 मनुके

  • वेलची पावडर

  • काजू

  • बदाम


केळीची खीर बनवण्याची कृती



  • सर्वप्रथम एका भांड्यात दूध चांगलं उकळून घ्या.

  • दूध घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर उकळून घ्या.

  • दूध उकळत असतानाच त्यात सर्व ड्रायफ्रूट्स टाका.

  • काजू, बदामाचे तुकडे करुन दुधात टाका.

  • मनुके दुधात टाका.

  • यानंतर एक मिनिट दूध उकळू द्या.

  • आता दुधात केशर, वेलची पावडर टाका.

  • गूळ किंवा साखर घालून मंद आचेवर साखर विरघळू द्या.

  • आता केशर देखील काही वेळात आपला रंग सोडेल.

  • यानंतर 1 किंवा 2 केळी चांगली मॅश करून घ्या.

  • मॅश केलेली केळी एका भांड्यात ठेवा.

  • त्यात वरुन हे उकळलेलं दूध घाला.

  • केळी आणि दूध एकमेकांत चांगलं मिसळा.

  • तुमची केळीची खीर खाण्यासाठी तयार आहे.


शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व


नव म्हणजे नऊ आणि नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रुप पालटतो. ऋतू बदलू लागतात. यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात, तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. त्यामुळे ऋतुबदलाचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. 


नवरात्र 9 दिवस का साजरी केली जाते?


शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस 'विजयादशमी' (दसरा) म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा पराभव केला. एका पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून देवी मातेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून, माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळताना, तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते.


हेही वाचा:


Navratri 2023: नवरात्रीत तुमचाही उपवास आहे? मग उपवासानिमित्त घरच्या घरी बनवा भगरीचे धिरडे