Most Expensive Watermelon : कलिंगड (Watermelon) म्हणजे टरबूज सर्वांनीच खाल्लं असेल. साधारणपणे कलिंगड 20 रुपये प्रति किलो दराने मिळते. पण तुम्हाला लाखो रुपये किमतीला एक कलिंगड खरेदी करावा लागला तर... जगातील एक सर्वात महाग कलिंगड आहे. हे दुर्मिळ प्रजातीचं कलिंगड असल्यामुळे याची किंमत लाखो रुपये आहे. डेन्सुक ब्लॅक कलिंगड (Densuke Black Watermelon) प्रजातीचं जगातील सर्वात महागडं कलिंगड आहे. याला काळं कलिंगड (Black Watermelon) किंवा काळ टरबूज असंही म्हणतात.


कुठे आढळतं 'हे' कलिंगड?


सर्वात महागडं आणि दुर्मिळ कलिंगड (Watermelon) कुठे सापडतं आणि याची किंमत नेमकी किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, त्याचं उत्तर जाणून घ्या. जगातील सर्वात महाग कलिंगड जपानमध्ये आढळते. जपानच्या (Japan) होक्काइडो बेटाच्या (Hokkaido Island) उत्तरेकडील भागात हे अतिशय दुर्मिळ कलिंगड आढळतं. ही कलिंगडाची प्रजाती इतकी दुर्मिळ आहे की, एका वर्षात या प्रजातीचे फक्त 100  कलिंगडांची लागवड केली जाते. याच कारणास्तव त्याची किंमत खूप जास्त आहे. हे सर्व ठिकाणी उपलब्ध नसतं.


सर्वात महागड्या कलिंगडाची किंमत काय?


साधारणपणे कलिंगड बाजारात 20 ते 30 रुपये किलोने खरेदी करता येतं. पण डेन्सुक ब्लॅक कलिंगड (Densuke Black Watermelon) सामान्य कलिंगडाप्रमाणे बाजारात विकलं जात नाही. या कलिंगडाचा दरवर्षी लिलाव होतो. खरेदीदार हे कलिंगड मिळविण्यासाठी मोठी बोली लावतात. 2019 या वर्षात या कलिंगडासाठी 4 लाख रुपयांची सर्वात महागडी बोली लावली गेली होती. कोविड महामारीच्या काळात या कलिंगडाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. पण आजही हे कलिंगड जगातील सर्वात महाग कलिंगड आहे.


या कलिंगडामध्ये विशेष काय?


लाखो रुपयांना खरेदी विक्री होत असलेल्या या कलिंगडामध्ये नेमकं खास काय असा विचा तुमच्या मनात रेंगाळत असेल, तर यामागचं कारण जाणून घ्या. हे कलिंगड दिसायला अतिशय चमकदार आणि काळ्या रंगाचं असतं. हे सामान्य कलिंगडासारखं अजिबात दिसत नाही. या कलिंगडाच्या आतील फळाचा गर कुरकुरीत असतो. हे खूप गोड असते आणि इतर कलिंगडाच्या तुलनेत यामध्ये कमी बिया असतात. मिळालेल्या माहितीनुसार, या कलिंगडाचं फक्त पहिलंच फळ इतकं महाग आहे. यानंतरच्या पिकातून येणारं फळ 19 हजार रुपयांपेक्षा कमी दरात मिळतं.


संबंधित इतर बातम्या :


Watermelon Seeds Health Benefits : कलिंगडाच्या बियांचेही आहेत अनेक फायदे, ऐकून व्हाल चकित