Hindu Muslim Lesbian Couple: प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं! हे कवीने उगीच म्हटलेलं नाही. याच ओळीचा खरा अर्थ जगाला सांगणारी एक जोडी सध्या सोशल मीडियावरून जगभरात गाजते आहे. ही जोडी आहे अंजली चक्र (Anjali Chakra) आणि सुफी मलिक (Sufi Malik) यांची... सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेट जगतात अंजली आणि सुफीची प्रेमकथा प्रचंड चर्चेत आहे. यातील अंजली ही भारतीय हिंदू मुलगी असून, सुफी ही पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे.


सोशल मीडिया म्हटलं की, त्यावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींची चर्चा तर होणारच! सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच काही फोटो किंवा व्हिडीओ आणि त्यामागच्या कथा लोकांच्या मनाला इतक्या स्पर्शून जातात की, एकीकडून दुसरीकडे अशाप्रकारे जगभरात चर्चिल्या जातात. अंजली चक्र आणि सुफी मलिक यांची प्रेमकथा देखील त्यापैकीच एक आहे. हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान अशा कुठल्याच बंधनात न अडकता या मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत.



ना कुठलं बंधन, ना कुठली सीमा...


अंजली आणि सुफी ही जोडी जातीपातीचं बंधन मोडून जगाला आपल्या प्रेमाची दखल घेण्यास भाग पाडत आहे. दोघींनीही आपले एकमेकींवरचे प्रेम मोकळ्या मानाने स्वीकारले आहे. काही काळापूर्वी बोल्ड फोटोशूट करत आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची कथा सांगणारी ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. अंजली चक्र ही मूळची भारतीय हिंदू मुलगी आहे आणि सुफी ही मूळची पाकिस्तानी मुस्लिम मुलगी आहे. अंजली चक्रने तिची आणि सुफीची प्रेमकहाणी जगासमोर मांडली आहे.


समलैंगिक संबंधांबद्दल बिनधास्त बोलणारी ही जोडी जगभरात लोकप्रियता होऊ लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघी एकमेकींना डेट करत होत्या. मात्र, आता त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. आता त्या दोघीही आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. इतकंच नाही तर, सोशल मीडियावरून फोटो शेअर करत एकमेकींबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. आपण समलैंगिक आहोत, हे देखील त्या जाहीरपणे कबुल करतात. सोशल मीडियावर या दोघींचे फोटो व्हायरल होत असतात.



‘अशी’ झाली दोघींची भेट


सुफीला भेटण्यापूर्वी अंजली एका मुलाला डेट करत होती. मात्र, त्यांच्या नात्यात काही गोष्टी बिनसल्या आणि त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर सोशल मीडियाद्वारे अंजलीची ओळख सुफी मलिकशी झाली. सुफी एक कलाकार आहे, तर अंजली ही वेडिंग प्लॅनर आहे. दोघी एकमेकींशी खूप गप्पा मारू लागल्या. तेव्हाच अंजलीला कळले की, सुफी ही समलैंगिक आहे. यानंतर दोघींनी एकमेकींना भेटण्याचा निर्णय घेतला. अंजली भारतीय आणि सुफी पाकिस्तानी असली तरी, दोघी न्यूयॉर्कमध्ये राहतात. पहिल्या भेटीनंतरच त्यांच्यात प्रेमाचं नातं फुलू लागलं आणि त्यांनी कायम सोबत राहण्याचं ठरवलं.


संबंधित इतर बातम्या