Ladki bahin yojana: मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Ladki bahin yojana) मिळालेल्या पैशातून कुणाचं घरं भागतंय, कुणाचं सिलेंडर भागतयं, कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होतेय, तर कुणी या पैशाची बचत करुन व्यवसाय उभा सुरू करण्याचा विचार करतंय. मुंबईतल्या काळा चौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड या तरुणीने योजनातून मिळालेल्या पैशांतून थेट घुंगरू व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काही दिवसांतच तिने या व्यवसायाच्या माध्यमातून स्वत:चं नाव करत पैसेही कमावले आहेत. आता, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या लाडक्या बहिणीचं कौतुक करत टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमेच्या अगोदरच लाडक्या बहि‍णींच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा केले. या पैशामुळे कुठे महिला भगिनींच्या घरचा भार हलका झाला, तर कुठे महिलांच्या हक्काच्या खरेदीला किनार मिळाली. 


मुंबईतल्या काळाचौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारड या तरुणीने योजनेतून मिळालेल्या पैशांतून थेट घुंगरू व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा व्यवसायासाठी योग्य वापर करत, गणेशेत्सवाच्या दहा दिवसात दहा हजाराहून अधिकची कमाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिण योजनेतून देऊ केलेली ही आर्थिक मदत प्रणालीच्या व्यवसायासाठी संजीवनी ठरल्याचं प्रणालीने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तसेच, प्रणालीने मुख्यमंत्र्याचे तर आभार मानलेच, मात्र मिळणाऱ्या रक्कमेचा योग्य वापर करण्याचे आवाहनही योजनेचा लाभ घेणाऱ्या इतर महिलांना केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रणालीने सुरू केलेल्या घंगुराचा वापर करुन गणपती आरती आणि धार्मिक ठिकाणी ध्वनीचा निनाद करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे, गणेशोत्सव काळात तिने सुरू केलेल्या घंगुरू व्यवसायाला चांगलीच मागणी आहे. यातून प्रणालीचा कल्पना सत्यात उतरली असून आता पुढे हा व्यवसाय अधिक जामाने पुढे नेण्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. 


मुख्यमंत्र्‍यांनी ट्विट करुन विरोधकांना लगावला टोला


पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना त्याची किंमत नसते. पण, सर्वसामान्य कुटुंबाला आणि आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या मंडळींना त्याचे मोल नेमके समजते. महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यातून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या रकमेची खिल्ली उडवली. 1500 रुपयांत काय होणार, असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या ओवाळणीचा सन्मान आणि किंमत माझ्या लाडक्या बहिणींना नेमकी उमगली. त्यामुळेच त्यांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला. याच रकमेचा वापर करून काय करता येऊ शकते, याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून मिळालेल्या 1500 रुपयांतून काळाचौकीच्या प्रणाली बारट या बहिणीने गणेशोत्सव काळ लक्षात घेऊन एक छोटासा व्यवसाय केला आणि आज त्या 1500 रुपयातून मोठी कमाई करून दाखवल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे. 






उद्धव ठाकरेंना लगावला टोला


केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यानुसार आमच्या सरकारने राज्यातील बहिणींसाठी काही करण्याची इच्छाशक्ती दाखवली आणि बहिणींनीही त्याला सकारात्मक साथ दिली. आधीच्या सरकारच्या काळात दानतच नव्हती, त्यामुळेच त्यांना देण्यातील आनंद आणि समाधान कसे कळणार?, असा टोलाही त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंना लगावलाय.


हेही वाचा


मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य