सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली असून 17 सप्टेंबरपासून ते उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री 12 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही उपोषणाची घोषणा केली आहे.  ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असल्याची घोषणाच लक्ष्मण हाकेंनी केलीय. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना ओबीसीची ताकद या निवडणुकीत दिसेल, असे म्हणत हाकेंनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा उपोषणवजा संघर्ष सुरू होणार असल्याचे दिसून येते. 


मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने आमदार पाडण्याची भाषा केली जाते, आता लक्ष्मण हाके यांनीही ओबीसींकडूनही मराठवाड्यात 25 आमदार पाडण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच, आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई आता आमदारांना पाडापाडीची बनताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सामाजिक आरक्षणाचा लढा, आता राजकीय होताना दिसून येते. लक्ष्मण हाके यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले की, मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच ठिकाणी ओबीसीचे उपोषण सुरू झालेले दिसेल. जरांगे यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी देखील उत्तर देतील. नुसत्या मराठवाड्यात 25 आमदार ओबीसींकडून पाडण्यात येणार आहेत. आमच्याकडे त्या 25 आमदारांची यादीही तयार आहे. त्यामुळेच आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले, असा गौप्यस्फोटही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.  


जरांगेंना भेटलेल्या नेत्यांची यादी आमच्याकडे


या विधानसभेला शरद पवार, एकनाथ शिंदे, काँग्रेस यांना ओबीसी मोठा दणका देणार आहेत. जे नेते जरांगेंना भेटलेत, त्याची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना निवडणुकीत ओबीसी धूळ चालणार आहे, असेही हाकेंनी म्हटलं आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंच्या दबावाखाली वाटेल ते मागण्या मान्य करण्याच्या तयारीत असून यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणारी नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलाय. 


हेही वाचा


फोटो अन् आधार कार्ड महिलांचं, अर्जावर नाव पुरुषांचं, लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करणाऱ्या भावांचा भांडाफोड