Murder For iPhone : जगभरातील बाजारपेठेत अनेक फोन आले असले तरी आयफोनची क्रेझ काही कमी होत नाही. उलट हा फोन आपल्याकडे असावा यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. महाग असला तरी त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण याच आयफोनच्या वेडामुळे एका 12 वर्षांच्या मुलीने तिच्या 8 वर्षांच्या बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं. 


अमेरिकेतील टेनेसीमध्ये (Tenancy in the United States) ही धक्कादायक घटना घडली असून 12 वर्षांच्या मुलीने आयफोनसाठी आपल्याच 8 वर्षांच्या बहिणीची निर्दयी हत्या केली. एवढंच नाही तर तिच्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून तिने पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला असं वाटणाऱ्या आई-वडिलांनी घरातील सीसीटीव्ही तपासला असता त्यांना धक्काच बसला.  


आयफोनवरून बहिणींमध्ये व्हायची भांडणे


आयफोनवरून या दोन बहिणींमध्ये झालेलं भांडण हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी मुलगी ही मृत मुलीची चुलत बहीण आहे. तिच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. आरोपी मुलगी ही अल्पवयीन असली तरी तिच्यावर खून आणि पुराव्याशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डेमारिया हॉलिंग्सवर्थ असं 8 वर्षांच्या मृत मुलीचे नाव आहे. तिची आई रेना स्मिथने GoFundMe वर एक भावनिक पोस्ट लिहिली, 'मी नुकतीच माझी सुंदर मुलगी गमावली आहे. मला होणारा त्रास असह्य आहे. मला वाटले नव्हते की माझी मुलगी अशी आम्हाला सोडून जाईल.


गळा दाबून केली हत्या


पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यात आरोपी मुलगी तिची बहीण डेमरिया हिचा गळा दाबताना दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत आरोपी मुलगी तिच्या आजीकडे राहण्यासाठी आली होती. आयफोनवरून दोन बहिणींमध्ये खूप भांडण व्हायचे. पण त्याचे परिणाम इतके वाईट होऊ शकतात, याचा विचार कोणी केला नव्हता. गळा आवळल्यानंतर आरोपी तरुणीने आपल्या बहिणीचा मृतदेह बेडवर अशा प्रकारे ठेवला की जणू ती झोपली आहे.


आरोपी मुलगी खूपच लहान आहे, पण तिने हिंसक कृत्य केले आहे. आरोपी मुलीवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवावा असे फिर्यादी पक्षाचे मत आहे. ती दोषी आढळल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी चर्चा आहे. 


ही बातमी वाचा: