पुणे : बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यासमवेत प्रवाशी किंवा वाहनधारकांचा वाद नवा नाही. अनेकदा या वादामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण होते, तर काहीवेळा कंडक्टरसोबत घातलेला वाद थेट पोलिस (Police) स्टेशनलाही घेऊन जातो. मात्र, पुण्यातील (Pune) पीएमपीचालकासोबत आता चक्क एका पोलीस शिपायाचाच वाद झाल्याची घटना घडली आहे. त्यानुसार, पोलीस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर पोलीस शिपाई त्यास मारहाण करत असल्याचे दिसते. या हाणामारीत दोघेही एकमेकांची कॉलर पकडून मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video) चांगलाच व्हायरल झाला असून अखेर दोघांनीही सामोपचाराने हा वाद मिटवला आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील ही घटना असून पोलीस शिपायावर सोशल मीडियातून टीका केली जात आहे. 


पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील पीएमटीचालक आणि पोलिसामध्ये किरकोळ कारणावरुन हा वाद झाल्याची माहिती आहे. चालकाने गाडी चालवताना पोलीस शिपायाच्या दुचाकीजवळून चालवल्याचा आरोप पोलिसाने केला आहे. त्यावरुनच दोघांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली होती, त्यानंतर थेट मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी पोलिसांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. दरम्यान, घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर दोघांनाही उपरती सूचली असून पोलीस शिपायाने स्वत: पोलीस ठाण्यात अर्ज देत सामोपचाराने आमचं भांडण मिटलं असल्याचं म्हटलं आहे. 


पीएमटी चालकास मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे अर्ज केला आहे. त्यानुसार, उपरोक्त विषयान्वये अर्ज सादर करतो की, दि. 21/07/2024 वार रविवार रोजी माझा व PMT चालक PMT 5. MH12 F2 8243 यांच्याशी माझे किरकोळ वाद झाला होता. सदर इसम का चालक भागवत तोरणे व मी स्वत: पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आमच्यात सदर तक्रारीबाबत समजुतीने वाद मिटवण्यात आला आहे. तरी सदर व्यक्तीबाबत माझी कोणतीही तक्रार नाही, त्यांचा PMT चे ट्रिपचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणूने आहे, त्यानुसार मी त्यांचे 3000/- रुपये रोखीने भरले आहेत, असा जबाबच पोलीस शिपाई आर.ए. वाघमारे यांनी लिहून दिलं आहे. दरम्यान, या घटनेची कोरेगाव पोलीस स्टेशन आणि पीएमपी मंडळात चांगलीच चर्चा होत आहे. तर, सोशल मीडियातून नेटीझन्सही या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.


हेही वाचा


धक्कादायक! जिममध्ये व्यायाम करताना खाली कोसळले; छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकाचा मृत्यू