Independence Day 2023: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर (Independence Day) दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दिल्लीतील प्रमुख ठिकाणं आणि गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवादी कट रचणाऱ्या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पोलीस काम करत आहेत, अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपास अधिक कडक करण्यात आला आहे. अशातच, फक्त दिल्लीच नाही, तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमध्येही (Sarojini Market) पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्रत्येक एंट्री आणि एक्झिट गेटवर नजर ठेवली जात असून संशयितांचीही चौकशी केली जात आहे.


काही वर्षांपूर्वी सरोजिनी नगर मार्केटमध्ये झाला होता स्फोट


सरोजिनी नगर मार्केट हे होलसेल कपडे खरेदीचं मोठं केंद्र आहे. केवळ दिल्लीच नाही, तर दिल्लीबाहेरूनही लोक खास कपडे खरेदीसाठी सरोजिनी नगर मार्केटला येतात आणि त्यामुळेच येथे खरेदीदारांची नेहमीच गर्दी असते. याच कारणामुळे काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी सरोजिनी नगर मार्केटला आपलं लक्ष्य बनवलं होतं, ज्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. गेल्या वर्षीही या मार्केटला दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली होती. दिल्लीतील गजबजलेलं आणि संवेदनशील ठिकाण असल्याने दिल्ली पोलिसांनी सरोजिनी मार्केटमधील सुरक्षा वाढवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असून 15 ऑगस्टपर्यंत सरोजिनी नगर मार्केटची सुरक्षा व्यवस्था  कडक करण्यात आली आहे.


पोलीस प्रशासनासह सुरक्षारक्षक देखील तैनात


एबीपी लाइव्हच्या टीमशी संवाद साधताना सरोजिनी नगर मिनी मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक रंधावा यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी 15 ऑगस्ट आणि जी-20 च्या पार्श्वभूमीवर सरोजिनी मार्केटची सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली पोलिसांच्या अलवाल BSF चे जवानही मार्केटमध्ये तैनात असून सर्वत्र नजर ठेवली जात आहे. त्याचबरोबर दुकानदारांच्या वतीनेही 10 सुरक्षा रक्षक बाजारात तैनात करण्यात आले आहेत.


पोलिसांकडून दुकानदारांना सतर्क राहण्याचं आवाहन


दिल्ली पोलिसांनी सरोजिनी नगर मार्केटमधील दुकानदारांसोबत एक बैठकही घेतली होती, ज्यामध्ये दुकानदारांना सांगण्यात आलं होतं की, दुकानात कोणत्याही ग्राहकाचं सामान ठेवू नये आणि कोणत्याही अनोळखी वस्तूंना हात लावू नये. पोलिसांनी सर्व दुकानदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दुकानदार हे पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र, पोलिसांचं पथक वारंवार मार्केटमध्ये येत असल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे, मात्र अशा परिस्थितीत सुरक्षाही आवश्यक आहे. मात्र, पोलिसांकडून करण्यात येणारं अनाऊन्समेंट सध्या बंद झालं असून, ते सुरू करण्यात यावं, असं मार्केटचे अध्यक्ष म्हणाले.


हेही वाचा:


Gyanvapi Masjid ASI Survey : ज्ञानवापीच्या तळघरात आणखी काय सापडलं?