Uttar Pradesh Assembly: उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Assembly) नवीन नियमावलीत तरतूद करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, विधानसभा सदस्यांना सभागृहात मोबाईल फोन (Mobile Phone) आणण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही प्रकारचे झेंडे (Flags) किंवा इतर निदर्शनासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू सभागृहात आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेश ज्या विधानसभेच्या नियम समितीचे अध्यक्ष रामपाल वर्मा यांनी सोमवारी (7 ऑगस्ट) सभागृहात 156 पानांची नियमावली सादर केली, ज्यामध्ये या शिफारसी करण्यात आल्या आहेत.
सभागृहात झेंडे, पोस्टर्स आणण्यावरही बंदी
विरोधी पक्ष हे अनेकदा झेंडे, बॅनर्स आणि अनेक घोषवाक्यं लिहीलेली फलकं घेऊन सभागृहात येतात आणि विविध विषयांवर निदर्शनं करतात. सभागृहात चालणारे असे प्रकार थांबवण्यासाठी सभागृहात झेंडे, पोस्टर्स आणण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. विधानसभा सदस्य अध्यक्षांच्या आसनाकडे जाणार नाही, असा नियम देखील बनवण्यात आला आहे.
प्रश्नांवर उत्तर न दिल्यास सचिवालयाला कळवावं लागणार कारण
नियमावलीत प्रस्तावित केलेल्या एका नियमामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, जर एखाद्या मंत्र्याला सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देता आली नाहीत तर त्या मंत्र्याला विधानसभेच्या सचिवालयाला कारणांसह माहिती द्यावी लागेल.एखादा मंत्री विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याच्या स्थितीत नसेल तरी त्याला विधानसभेच्या सचिवालयाला कारण द्यावं लागणार आहे.
धूम्रपान करण्यास, मोठ्याने बोलण्यास मनाई
नव्या नियमांनुसार, विधानसभा सदस्यांना धूम्रपान करण्यास मनाई असेल. सभागृहात कोणतंही दस्तऐवज फाडण्यास आणि लॉबीमध्ये मोठ्याने बोलण्यास देखील मनाई असेल, जेणेकरुन सभागृहातील इतरांना नीट ऐकू येईल.
अध्यक्षांना पाठ दाखवून बसण्यास मनाई
नवी नियमावलीप्रमाणे, कोणताही सदस्य स्पीकरला पाठ दाखवून उभा राहणार नाही किंवा बसणार नाही. सदस्यांनी स्वतः अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाऊ नये, असंही नियमात म्हटलं गेलं आहे. गरज भासल्यास सदस्य तिथे बसलेल्या अधिकाऱ्यामार्फत अध्यक्षाला स्लिप पाठवू शकतील.
उद्या होणार नवीन नियमावलीवर चर्चा
विधानसभेच्या नव्या नियमालवीर बुधवारी (9 ऑगस्ट) चर्चा होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नवी नियमावली स्वीकारली जाणार असून ती पुढील अधिवेशनापासून प्रभावीपणे लागू होईल. उत्तर प्रदेश विधानसभेने नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन (NeVA) सादर केल्यानंतर सुमारे 65 वर्षांनंतर नवीन नियमावली स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, आता सभागृहाचं कामकाजही पेपरलेस करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेचे नवीन नियम
- विधानसभा सदस्य सभागृहात मोबाईल आणणार नाहीत.
- सभागृहातील सदस्यांना नीट ऐकू यावं यासाठी लॉबीमध्ये जोरात बोलण्यास, हसण्यास मनाई
- विधानसभेतील कोणतेही कागदपत्र फाडता येणार नाही.
- विधानसभा सदस्य सभागृहात धुम्रपान करता येणार नाही.
- विधानसभेत शस्त्रं आणण्यास अथवा अथवा दाखवण्यास मनाई
- स्पीकरकडे पाठ करुन बसणार नाही किंवा उभे राहणार नाही.
हेही वाचा:
No Confidence Motion: विरोधकांचा मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; लोकसभेतील मतांचं गणित काय?