World End: तुमच्याही मनात अनेकदा आलं असेल की लवकरच जगाचा (World) अंत होणार आहे, कधी ना कधी संपूर्ण जग बुडणार आहे, जगाचा विनाश होणार आहे. पण नेमकं या जगाचा अंत होणार कधी? आणि मानवी जीवन संपुष्टात कधी येऊ शकतं? असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का? तर मानवाच्या मृत्यूबाबत विविध संशोधनांत अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. मात्र यावेळी एका शास्त्रज्ञाने एक धक्कादायक दावा केला आहे. या शास्त्रज्ञाने मानवी अस्तित्वाच्या अंताची तारीखच उघड केली आहे.


मानवाचा अंत लांबला


युकेतील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक अहवाल तयार केला आहे आणि या अहवालात मानवाचा मृत्यू कधी होणार? हे सांगितलं गेलं आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मानवाच्या मृत्यूला अजून बराच अवधी शिल्लक आहे. तब्बल 25 कोटी वर्षांनंतर मानवाचं अस्तित्व नाहीसं होण्याची शक्यता आहे.


डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ संशोधन सहकारी डॉ. अलेक्झांडर फारन्सवर्थ यांनी या विषयावर संशोधन केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, सतत वाढत जाणारं तापमान आणि अति उष्णतेमुळे मानवाचा मृत्यू होईल. अति उष्णतेमुळे बलाढ्य महाद्वीप तयार होईल आणि नंतर ज्वालामुखीचा उद्रेक होईल, यात संपूर्ण मानव प्रजाती नष्ट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.


माणसांचं भविष्य धोक्यात


मानवाचं भविष्य खूप अंधारात दिसत असल्याचं डॉ. फार्न्सवर्थ म्हणाले. येत्या काळात धोकादायक कार्बन डायऑक्साइडची पातळी आजच्या तुलनेत दुप्पट असणार आहे. इतकंच नाही तर सूर्यापासून सुमारे 2.5 टक्के अधिक किरणोत्सर्ग होण्याची शक्यता आहे. असा दावा केला जात आहे की, पृथ्वीच्या बहुतेक भागात येत्या काळात 40 ते 70 अंश सेल्सियस तापमान असू शकतं, ज्याची झळ मानवी अस्तित्वाला बसणार आहे.


डॉ. अलेक्झांडर फारन्सवर्थ म्हणाले, भविष्यात उष्ण तापमान, तळपता सूर्य, वातावरणातील वाढलेला कार्बन डायऑक्साईड या सर्वाचा सामना करावा लागणार आहे. या सर्वाचा वाईट परिणाम सस्तन प्राण्यांवर होईल, भविष्यात  सस्तन प्राण्यांसाठी वातावरणातील अन्न आणि पाण्याचे स्रोत कमी होतील.


माणसं सहन करू शकणार नाहीत उष्णता


शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, भविष्यात तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याने उष्णता प्रचंड वाढेल. तापमान इतकं वाढेल की मानवाला ते सहन करणं शक्य होणार नाही. तापमान वाढीची ही समस्या रोखण्याचा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे, जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuels) वापर थांबवणे.


जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवन दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. आयुष्याची वर्षं कमी होत आहेत. मानवाचा अंत लवकर होण्यापासून थांबवायचं असेल तर आपल्याला जीवाश्म इंधनाचा वापर थांबवावा लागणार आहे.


हेही वाचा:


पेट्रोल गरम केलं तर काय होईल? गॅस पेटवताच आग लागेल का? जाणून घ्या