Godwit Bird Guinness World Record : तुम्ही एखादा पक्षी (Bird) किती दूरपर्यंत उडताना पाहिला आहे. कदाचित तुम्ही पक्षाला काही किलोमीटरपर्यंत उडताना पाहिलं असेल. पण जगात असा एक पक्षी आहे, ज्याने 11 दिवस सतत उड्डाण केले आणि 13,560 किलोमीटरचे अंतर कापले आहे. काही शास्त्रज्ञांनी एका गॉडविट पक्ष्याला (Godwit Bird) टॅग केले आणि त्याला पुन्हा त्याच्या सहवासात सोडले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी टॅगद्वारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. शास्त्रज्ञांना निरीक्षण करताना आढळले की, या पक्ष्याने सतत 11 दिवस उड्डाण केलं आहे. हा पक्षी 11 दिवस न थांबता उडत होता आणि यावेळी त्याने सुमारे 13,560 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. या पक्षाच्या नावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. या पक्षाचं नाव 'गॉडविट' (Godwit Bird) असं आहे.


सतत 11 दिवस उड्डाण


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या गॉडविट पक्षाची सर्वाधिक वेळ उड्डाण करणाऱ्या आणि सर्वाधिक अंतर कापणाऱ्या अंतराच्या विक्रमाची नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या गॉडविट पक्ष्याने 12 ऑक्टोबर 2022 रोजी अमेरिकेतील अलास्का येथून प्रवास सुरू केला आणि हा 11 व्या दिवशी ऑस्ट्रेलियातील तस्मानिया येथे थांबला. या दरम्यान या पक्ष्याने 13,560 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या पक्ष्याने 11 दिवस सतत न थांबता उडत राहिला आणि प्रवास पूर्ण केला. शास्त्रज्ञांनी या गॉडविट पक्षाच्या पाठीच्या खालच्या बाजूला 5G सॅटेलाईट टॅग लावला होता, ज्याच्या मदतीने शास्त्रज्ञ या पक्षाचा आणि त्याच्या हालचालींना मागोवा घेत होते.


यापूर्वीही 'या' प्रजातीच्या पक्ष्याच्या नावे विक्रम


2020 मध्ये याच प्रजातीच्या एका पक्ष्याने सर्वात लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्याचा विक्रम यापूर्वी केला होता. यावेळी या पक्ष्याने एका उड्डाणात 350 किलोमीटरचे अंतर कापले होते. 


गॉडविट पक्षी


गॉडविट पक्ष्याचा आकार फायटर प्लेनसारखा असतो आणि त्याचे लांब टोकदार पंखांमध्ये हवेत वेगाने उडण्याची क्षमता असते. या पक्ष्याचे वजन 230 ते 450 ग्रॅमपर्यंत असते. गॉडविट पक्ष्याच्या पंखांची रुंदी सुमारे 70 ते 80 सेमीपर्यंत असते. तर, प्रौढ गॉडविट पक्षाची लांबी 37 ते 39 सेंटीमीटर दरम्यान असू शकते.


गॉडविट  पक्षी इतके लांब अंतर कसे कापतात?


गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकार्‍यांनी या पक्ष्याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, दिवसा आणि रात्री उड्डाण करताना हे पक्षी त्यांचे वजन अर्धे किंवा त्याहून कमी करतात. यासोबतच ते उडताना हातपायांचे आकुंचन करतात त्यामुळे या पक्ष्याचे शरीर हवेत उडत असताना खूपच लहान होते. यामुळे, हे पक्षी न थांबता बराच वेळ उडू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या