Salt in Ice : उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. उन्हाळा सुरू झाला की, प्रत्येकाचा आवडता पदार्थ म्हणजे थंडपेय. सहसा प्रत्येकाला थंडपेय आणि थंडगार पदार्थ आवडतात. उन्हाच्या कडाक्यात थंडगार पदार्थ चाखण्यात वेगळाच आनंद असतो. त्यातच कुल्फीवाला दिसला की, आपल्याला कुल्फी खाण्याचा मोह आवरत नाही आणि आपण लगेच कुल्फी विकत घेतो आणि त्याचा मनसोक्त आनंद घेतो. उन्हाळ्यात रस्त्यांवर, गल्लीबोळात कुल्फीवाले आपल्याला आढळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कुल्फी आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का, कुल्फीतील बर्फात मीठ असते. हो हे खरं आहे.


आपण कुल्फी विक्रेत्यांच्या गाडीवर एक मोठा बॉक्स पाहिला असेल, त्यात बर्फ असतो हे सर्वांनाच माहिती असेलच. त्यात तो कुल्फी ठेवतो. त्याच्याजवळ असलेल्या बर्फाला फोडून त्यात मीठ टाकून ते बर्फ तो बॉक्सच्या मध्यभागी ठेवतो. जर तुम्ही त्याला असं करताना बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की तो असा का करतो? तर यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घ्या.


खरंतर, असं करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. विज्ञान विषयाची थोडीफार माहिती असणाऱ्यांना बॉईलिंग पॉंईट आणि फ्रिजींग पॉंईटबद्दल माहिती असेल. आपण शाळेत याबाबत शिकलो आहोत. बर्फात मीठ टाकणं हे याच सिद्धांतावर अवलंबून असतं. 


फ्रिजिंग पॉंईट


फ्रिजिंग पॉंईट म्हणजे असं तापमान, ज्यात पदार्थ द्रव अवस्थेतून घनरुप अवस्थेत जाऊन गोठतो. जसं की पाण्याचं तापमान जर शून्य डिग्रीवर आल्यास त्या पाणी गोठून त्याचं बर्फात रुपांतर होतं. त्यामुळे पाण्याचा फ्रिजिंग पॉंईट शून्य डिग्री सेल्सिअम आहे. प्रत्येक पदार्थांचे फ्रिजींग पॉंईट वेगवेगळे असतात.


बॉईलिंग पॉंईट


बॉईलिंग पॉंईट म्हणजे एक असं तापमान आहे ज्यात द्रव पदार्थ उकळायला लागतो. जर आपण पाण्याचंच उदाहरण घेतलं तर, पाणी 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर उकळायला लागतो.


कुल्फी विकणारा बर्फात मीठ घालतो?


जेव्हा एखाद्या पदार्थात आपण अवाष्पशील पदार्थ (Non Volatile Matter) मिसळतो तेव्हा त्या पदार्थाचा बाष्प दाब घटतो. म्हणजेच काय तर फ्रिजींग पॉंईट घटतो तर बॉईलिंग पॉंईट वाढतो. अवाष्पशील पदार्थ म्हणजे ज्या पदार्थांची वाफ वेगाने होत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, बर्फात मीठ टाकल्यानं बर्फाचा फ्रिजींग पॉंईट वाढतो आणि बर्फ लवकर वितळत नाही. त्यामुळे कुल्फीवाला बर्फात मीठ टाकत असतो, ज्यामुळे बर्फ दीर्घकाळ टिकून राहतो. असे केल्यानं त्याला जास्त फायदा मिळतो. बर्फ जास्त वेळ टिकल्याने कुल्फी जास्त काळ घट्ट राहते.