फ्लोरिडा: लहान मुलं अनेकदा खोडसाळपणा करताना त्यांचा जीव धोक्यात घालतात. मस्ती मस्तीत ते कधी काय करतील याचा नेम नसतो, त्यामुळे पालकांना (Parents) आणि घरातील प्रत्येक व्यक्तील लहान मुलांवर लक्ष ठेवावं लागतं. लहान मुलांना थोडा वेळ जरी एकटं सोडलं तर तुमची डोकेदुखी वाढू शकते. आता अशीच एक धक्कादायक घटना फ्लोरिडातून (Florida) समोर आली आहे. फ्लोरिडात एका 3 वर्षाच्या मुलीने खेळता खेळता सोफ्यावर ठेवलेली बंदूक (Gun) उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली.


नेमकं घडलं काय?


खरं तर, या मुलीचे आई-वडील आपापल्या कामात व्यस्त होते आणि ही त्यांची छोटी मुलगी सेरेनिटी ही हॉलमध्ये खेळत होती. त्यांच्या घरातल्या सोफ्यावर बंदूक ठेवली होती. खेळता-खेळता लहान मुलीचं लक्ष सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीकडे जातं आणि ती पटकन बंदूक उचलते. हातात बंदूक उचलताच तिच्याकडून गोळी झाडली जाते, ज्यानंतर ही मुलगी मोठमोठ्याने ओरडू लागते.


गोळीचा आवाज कानावर पडताच शेजारी उभा असलेला घरातील व्यक्ती मुलीजवळ जातो आणि तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो घरात उपस्थित असलेल्या इतर लोकांना बोलवतो आणि सर्वजण मुलीच्या मदतीला धावून येतात. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुलगी स्वत:वर गोळी झाडताना दिसत आहे.


मुलीवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर


मुलीची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून तिला निक्लॉस चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तिथे तिच्या हातात घुसलेली गोळी काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. यानंतर मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. व्हायरल होत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ मुलीची आजी रॉबिन फुलर हिने फेसबुकवर पोस्ट केला आहे.


घरातील व्यक्तीला करण्यात आली होती अटक


द सनच्या रिपोर्टनुसार, मुलीच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती तिचा कुणी नातेवाईक आहे, ज्याचं नाव ओरलँडो आहे. ओरलँडो याला विनापरवानगी बंदूक बाळगल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती, पण नंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आलं.






परिस्थिती चिघळण्याची होती शक्यता


ज्या वेळी सेरेनिटीने स्वत:वर गोळी झाडली, त्यावेळी तिचा लहान भाऊ देखील तिच्यासोबत हॉलमध्ये खेळत होता. जसा गोळीचा आवाज झाला, तसं शेजारी उभ्या असलेल्या तिच्या भावाने कानावर हात ठेवला. ओरलँडोने पोलिसांना सांगितलं की, त्याने केवळ काही काळासाठी बंदूक सोफ्यावर ठेवली होती. सेरेनिटी बंदूक घेऊन स्वत:वर गोळी झाडेल याची कल्पना त्याला नव्हती. पण या निष्काळजीपणाचे परिणाम आणखी वाईट झाले असते, असं सेरेनिटीच्या आजीने सांगितलं. सुदैवाने या मुलीचा जीव वाचल्याचं आजी म्हणाली.


हेही वाचा:


Human Death: कधी आणि कसा होणार मानवाचा अंत? शास्त्रज्ञांनी उघड केली तारीख