Ethiopia Bodi Tribe : सध्या अनेक लोक वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. निरोगी राहण्यासाठी आपली जीवनशैली चांगली असली पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. एकीकडे लोक वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम असे अनेक उपाय करताना दिसतात. तर, दुसरीकडे काही लोक असेही आहेत, जे पोटावरील चरबी वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. याचं कारण म्हणजे, जगाच्या एका कोपऱ्यामध्ये अशीही एक जागा आहे, जिथे वाढलेलं पोट असणाऱ्या पुरुषांना जास्त मान दिला जातो. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.
पोट वाढलं असेल तर इथं मिळतो सुपरस्टारचा दर्जा
येथे जास्त पोट सुटलेल्या पुरुषांना सुपरस्टारचा दर्जा दिला जातो. जगभरात अनेक विविध जमाती आहेत, ज्या आजही आपल्या परंपरांचे पालन करतात. अशाच एका जमातीची ही विचित्र परंपरा आहे. जाणून घ्या या जमातीबद्दल आणि ही विचित्र परंपरा नेमकी काय आहे, त्याबाबत सविस्तर...
लठ्ठ होण्यासाठी करतात मेहनत
आफ्रिकेच्या जंगलामध्ये राहणाऱ्या एका जमातीमध्ये ही विचित्र परंपरा आहे. इथे लोक वजन कमी करण्यासाठी नाहीतर वजन वाढवण्यासाठी मेहनत घेतात. आफ्रीका खंडातील इथिओपियातील (Ethiopia) ओमो व्हॅलीच्या (Omo Valley) जंगलात राहणाऱ्या बोडी जमातीमध्ये (Bodi Tribe) ही एक विचित्र परंपरा आहे. या जमातीचे पुरुष चरबी आणि पोट वाढवण्यासाठी खूप मेहनत करतात. हे लोक प्राण्यांचे रक्तही पितात. या जमातीत लठ्ठ आणि गुबगुबीत पुरुषांना सुपरस्टारचा दर्जा दिला जातो.
वजन वाढवण्यासाठी पितात जनावरांचं रक्त
एका रिपोर्टनुसार, ओमो व्हॅलीच्या जंगलात राहणाऱ्या बोडी जमातीचे लोक गाईचे दूध आणि रक्त पितात. हे लोक गाईचे दूध आणि रक्त एकत्र मिसळून पितात. प्राण्यांचे रक्त पिण्यासाठी प्राण्याला मारत नाहीत, तर त्याच्या शरीरातील नस कापून तेथून त्याचे रक्त काढतात. दरवर्षी येथ नवीन वर्षाच्या निमित्ताने कोयल नावाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या समारंभात पुरुषांमध्ये एक स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यामध्ये अविवाहित पुरुषांना गाईचे दूध आणि रक्त मिसळून प्यावे लागते.
सहा महिन्यांपूर्वी सुरू होते तयारी
या स्पर्धेत भाग घेणारे पुरुष सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात. या काळात त्यांना कोणत्याही महिलेशी संबंध ठेवता येत नाही आणि घराबाहेर पडण्यासही बंदी असते. या दरम्यान त्यांना जनावराचे रक्त आणि दूध प्यावे लागते. या पुरुषांना दोन लिटर दूध आणि त्यात मिसळलेले रक्त सूर्योदयाच्या वेळी प्यावे लागते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cat Temple : भारतातील 'या' मंदिरात केली जाते मांजरीची पूजा, 1000 वर्ष जुनी परंपरा; कारण माहितीय?