Mangamma Temple in Karnataka : भारत (India) हा धार्मिक आस्था आणि परंपरा मानणारा देश आहे. आपल्या देशात विविध कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा मानल्या जातात. भारतात झाडे, पर्वत, नद्या आणि अशा अनेक गोष्टींची पूजा केली जाते. याचं भारतीयांच्या जीवनाशी फार गहन संबंध आहे. भारतात लोक देवाची आणि त्याच्या वाहनाचीही पूजा करतात. श्री गणेशासोबतच त्याचे वाहन आहे, म्हणून अनेक ठिकाणी उंदराचीही पूजा केली जाते. तसेच घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन असल्यामुळे त्याला देखील पवित्र स्थान आहे. दुर्गामातेचे सिंह वाहन आहे, त्यामुळे मंदिरात सिंहाचीही पूजा केली जाते.


'या' मंदिरात केली जाते मांजरीची पूजा


दरम्यान, काही प्रथेनुसार, काही प्राण्यांना अशुभ मानले जाते. यातील एक प्राणी म्हणजे मांजर. एखादी मांजर रस्त्याने आडवी गेली म्हणजे अशुभ अशी अंधश्रद्धा पाळणारे अनेक लोक आजच्या आधुनिक जगातही आहेत. पण याच भारतात एका ठिकाणी या मांजरीची चक्क पूजा केली जाते. मांजरीचं मंदिरही आहे. हो, हे खरं आहे. काही जण मांजरीला अशुभ मानतात. असं असली तरी बरेच लोक मांजरी पाळतात. पण भारतातच एका ठिकाणी मांजरीचं मंदिर असून येथे फार पुरातन काळापासून तिची पूजा केली जाते.


1000 वर्षांपासून केली जाते मांजरीची पूजा


कर्नाटकमध्ये हे मांजरीचं पुरातन मंदिर आहे. हे ठिकाण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात आहे. येथे बेक्कालेले नावाचे गाव आहे. या गावातील लोक गेल्या 1000 वर्षांपासून मांजरीची पूजा करतात. मांजर हा देवीचा अवतार आहे असे येथे राहणारे लोक मानतात, त्यामुळे त्यांची येथे मांजरीची पूर्ण विधीवत पूजा केली जाते. या गावातील लोक मांजरांना मंगम्मा देवीचे रुप मानतात.


मांजरीला आहे देवीचं स्थान


गेल्या 1000 वर्षांपासून बेक्काले गावातील हे मंदिर असून तेथे आजही मांजरीची पूजा केली जाते. या गावातील लोक मंगम्मा देवीला आपली कुलदेवी मानतात. यामुळेच देवीच्या रुपामुळे गावातील मांजरांना कोणी इजा केली तर त्यांना गावातून हाकलून दिले जाते. या गावात एखादे मांजर मेले तरी तिचं विधीवत दफन केले जाते.


'ही' परंपरा कशी सुरु झाली?


या गावातील लोक सांगतात की, शेकडो वर्षांपूर्वी हे संपूर्ण गाव वाईट शक्तींनी हैराण झाले होते. इथे दुष्ट शक्तींचा प्रकोप झाला तेव्हा मंगम्मा देवी मांजरीचे रुप घेऊन गावात आली आणि देवीने वाईट शक्तींचा नाश केला. त्यानंतर देवी मंगम्मा या गावातून अचानक गायब झाल्यावर त्यांनी इथल्या एका ठिकाणी छाप सोडली. त्याच ठिकाणी नंतर त्यांचे मंदिर बांधण्यात आले आणि तेव्हापासून लोक येथे मांजरींची पूजा करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या


Animal Fact : प्राण्यांचे डोळे अंधारात का चमकतात? 'हे' आहे कारण