Trending Video : सध्या लोकांमध्ये रील आणि फोटोशूटची क्रेझ प्रचंड वाढताना दिसत आहे. यासाठी लोक आपली जीवही धोक्यात घालण्यासाठी तयार आहेत. अलिकडेच कपल फोटोशूटचा ट्रेंडही प्रचंड वाढला आहे, अनेक जण आपल्या जोडीदारासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट करून घेतात, पण यावेळी ते विसरतात जीव धोक्यात घालणं महागात पडू शकतं. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. रेल्वे पुलावर एक कपल फोटोशूट करत होतं यावेळी ट्रेन येत असल्याचं पाहून दोघंही घाबरले आणि ट्रेनच्या धडकेपासून वाचण्यासाठी दोघांनीही सुमारे 90 फूट उंचीच्या पुलावरुन खाली उडी मारली.


फोटोशूटचा उत्साह नडला


राजस्थानमधील पाली जिल्ह्यात ही विचित्र दुर्घटना घडली आहे. राहुल मेवडा पत्नी जान्हवीसोबत पाली जिल्ह्यातील हेरिटेज ब्रिजवर फोटोशूट करत होता. तेवढ्यात मागून ट्रेन आली. ट्रेन अपघातातून वाचण्यासाठी दोघांनी 90 फूट उंचीवरुन खाली उडी मारली. सुदैवाने या दुर्घटनेत दोघांचा जीव वाचला, मात्र दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत. पत्नीवर बांगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पतीला पुढील उपचारांसाठी  जोधपूरला पाठवण्यात आलं आहे.


कपल फोटोशूट करणं महागात


हेरिटेज ब्रिजवर हे कपल फोटोशूट करत होतं, त्यावेळी मागून ट्रेन  आली. रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या कपलला पाहताच ट्रेनच्या लोको पायलटनेही ब्रेक लावला, त्यामुळे ट्रेन पुलावर आल्यानंतर थांबली. महत्त्वाचं म्हणजे लोको पायलटने वेळीच ब्रेक मारला होता, त्यामुळे हे दोघे तिथेच उभे राहिले असते तरी ट्रेनने त्यांना धडक दिली नसती. मात्र ट्रेन जवळ आल्याचं पाहून दोघांनी घाबरून जीव वाचवण्याच्या नादात पुलावरून खाली उडी मारली.


मागून ट्रेन येताच कपलची 90 फूट उंच पुलावरुन खाली उडी


ही घटना 13 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. पाली येथील गोरामघाट येथे मीटरगेज ट्रेनसाठी बांधलेल्या हेरिटेज पुलावर दोघेही फोटोशूट करत असताना हा अपघात झाला. तिथे उपस्थितांनी ही घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रितही केली. यावेळी मुलीची बहीण आणि भावजयही घटनास्थळी उपस्थित होते, ते काही अंतरावर उभे होते. या कपलने पुलावरून उडी मारली, तेव्हा त्यांच्या किंचाळण्याचा आवाज व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ : 






नेमकं काय घडलं?


राहुल मेवाडा (22) आणि जान्हवी (20) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. सुमारे दीड वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं. यातील राहुल हा काळलोनच्या बागडी नगर पिपलीयन येथील रहिवासी आहे. आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हे कपल आपल्या काही नातेवाईकांसह दुचाकीने गोरामघाट येथे गेले होते. दरम्यान, रेल्वे पुलावर फोटोशूट करत असताना ही दुर्घटना घडली. पुलावरुन खाली उडी मारल्यानंतर दोघांनाही त्याच ट्रेननं गंभीर अवस्थेत फुलाद रेल्वे स्थानकावर आणण्यात आलं आणि तेथून त्यांना रुग्णवाहिकेतून सोजत रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : ...जेव्हा थलायवा बिग बींसमोर नतमस्तक होतात; अंबानींच्या शाही सोहळ्यातील भारावून सोडणारा एक क्षण