Ayodhya Viral Video: रामजन्मभूमी असलेल्या आयोध्यानगरीमध्ये (Ayodhya) एका तरुणीला रील बनवणं महागात पडलं आहे. तिच्या या रीलवर अयोध्येतील साधू महतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रामजन्मभूमीतील शरयू नदीमध्ये तिने तिचा हा व्हिडीओ बनवला होता. यावर तिथल्या पंडितांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'या अशा लोकांना थांबवण्याचं फक्त पोलीस प्रशासनाचं काम नसून अयोध्येतील नागरिकांचे आहे', असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'यामुळे पवित्र नगरी असलेल्या अयोध्येच्या प्रतिष्ठेला अशा घटनांमुळे कलंक लागतो. त्यामुळे रामजन्मभूमीत अशा घटना घडणं हा दंडनीय अपराध आहे. पोलीस प्रशासनाने काळजी घ्यायला हवी की अशा घटना पुन्हा होणार नाहीत.'
तरुणीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सिमरन यादव नावाच्या एका तरुणीच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन व्हायरल झाला आहे. हनुमानगढीपासून ते रामजन्मभूमीला जाणाऱ्या मार्गावर शरयू नदीमध्ये तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका हिंदी गाण्यावर नृत्य करत आहे. पण तिच्या या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलचं फैलावर घेतलं. त्यानंतर सोमवारी (26 जून) रोजी तिने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन काढून टाकला. अयोध्या पोलीस मात्र या संदर्भात कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. परंतु वृत्तानुसार, पोलिसांनी या व्हिडीओसंदर्भात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्याकडून कारवाई करण्यासंदर्भात देखील चर्चा सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
रामजन्मभूमीमध्ये सुरु असणाऱ्या अशा घटनांमुळे तिथल्या पंडितांनी या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहत असताना अशा घटना घडण हे लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अशा घटनांना आळा बसवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी विनंती देखील अयोध्येतील पंडितांनी केली आहे.
तपस्वी छावनी जगतगुरु परमहंस आचार्य यांनी म्हटलं की, 'रामजन्मभूमीमध्ये एका तरुणीचा अशा गाण्यांवर व्हिडीओ व्हायरल होणं हे प्रशासन आणि सरकार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे. अशा वेळेस रामजन्मभूमीमध्ये व्हायरल होणारा हा व्हिडिओ जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणी निदर्शनास आणून देत आहे.' दरम्यान त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
Pakistan : कंगाल पाकिस्तानवर आलीये गाढवं विकण्याची वेळ; चीन करणार खरेदी, पण त्यांचं करणार काय?