Trending News : देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्साहात साजरा केला जातो. यंदा बुधवार, 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. देशात विविध शहरांमध्ये कलाकार मोठ्या गणेशमूर्ती बनवताना दिसतात. अशातच उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) गणपतीची मूर्ती बनवणाऱ्या मुलाची प्रतिभा पाहून अत्यंत प्रभावित झाले आहेत.
आनंद महिंद्रा आश्चर्यचकित
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगा गणेशाची मूर्ती बनवताना दिसत आहे. या दरम्यान, हा मुलगा एखाद्या मोठ्या कलाकार किंवा व्यावसायिक शिल्पकाराच्या रूपात मूर्तीला आकार देताना दिसत आहे. ज्याचे टॅलेंट पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये, लहान मुल गणेशाच्या अनेक मूर्तींमध्ये बसून एक मूर्ती बनवताना दिसत आहे. या दरम्यान, तो अत्यंत स्वच्छतेने मातीवर गणपतीची प्रतिमा कोरतो आणि त्याला मूर्तीचा आकार देतो. व्हायरल क्लिपमध्ये, मुलगा वेगाने गणपतीच्या सोंडेला आकार देत आहे. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
महान शिल्पकाराशी केली तुलना
आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ ट्विट करून लिहिले की, मुलाचा हात एखाद्या महान कारागीर किंवा शिल्पकारासारखा वेगाने फिरत आहे. अशा मुलांना कुठलंही प्रशिक्षण मिळतं का, की भविष्यात त्यांना ही प्रतिभा सोडून द्यावी लागेल, असा सवालही त्यांनी केला आहे.
नेटकऱ्यांकडून प्रतिभेचे कौतुक
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडीओ 5 लाख 69 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, 47 हजारांहून अधिक लाईक्ससह 3 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी ते रिट्विट केले आहे. त्यांचा फीडबॅक देऊन युजर्सनी त्या मुलाच्या प्रचंड प्रतिभेचे कौतुक केले आहे.