Anand Mahindra : छंद ही खूप मोठी गोष्ट आहे. असे काही लोक आहेत जे हटके काम करतात. जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल. अशाच एका व्यक्तीने आपल्या अभिनव कल्पनेने महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना आश्चर्यचकित केले आहे. आनंद महिंद्रा नेहमीच नवीन टॅलेंटची दखल घेत असतात. आता देखील यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून एक प्रश्न विचारला आहे. त्यासाठी त्यांनी चार पर्याय दिले असून या प्रश्नांचे उत्तर देण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.  


आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आता देखील आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर 25 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका तरुणाने कारच्या एका भाग आपल्या घराचे मुख्य गेट बनवले आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर ती व्यक्ती कारमधून बाहेर पडत असल्याचे तुम्हाला वाटेल. पण त्याने गाडीचे रूपांतर गेटमध्ये केले आहे. 


तरुणाने कारचा एक भाग मुख्य गेटला जोडला आहे, कारच्या पुढे आणि मागे प्रत्येकी एक चाक आहे. हे गेट पुढे मागे सरकत आहे. त्यामुळे गाडीच्या चाकाच्या मदतीने गेट उघडणे आणि बंद करणे अगदी सोपे जात आहे. मुख्य गेटमधील लहान दरवाजासाठी त्या व्यक्तीने कार गेटचा वापर केला आहे.






हा जबरदस्त व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लोकांना एक प्रश्न विचारला आहे, ज्यासाठी त्यांनी चार पर्याय दिले आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीबद्दल विचारले आहे की, तुम्ही त्याला कसे पाहता? आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी चार पर्याय दिले आहेत. 


1. उत्कट कार प्रेमी?
2. एक अंतर्मुखी, ज्याला वाटत आहे की, कोणीही आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू?  
3. अजब विनोदबुद्धी, जे नाविन्यपूर्ण आहे?
4. वरील सर्व? 


आनंद महिंद्राच्या या प्रश्नावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही युजर्स तरुणाची प्रशंसा करत आहेत आणि कल्पना पूर्णपणे नवीन असल्याचे म्हणत आहेत. एका युजर्सने एक मजेदार टिप्पणी केली आहे, त्याने म्हटले आहे की, हा तरुण नक्कीच जुगाड विद्यापीठातून पदवीधर आहे.