Anand Mahindra : शिकण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. केरळची कुट्टीअम्मा (Kuttiyamma) आजी याचंच जिवंत उदाहरण आहे. केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी असलेल्या कुट्टीअम्मा या आजीची अभ्यासाची तळमळ आणि उत्साह पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. कुट्टीअम्मा या आजी केरळमधील साक्षरता परीक्षेत पास झाल्या. विशेष म्हणजे, त्या 104 वर्षांच्या असताना त्यांनी केरळ साक्षरता परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवले आहेत. ही माहिती प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटरवर दिली आहे. 


खरंतर, केरळमधील कुट्टीअम्मा या 2021 मध्येच साक्षरता परीक्षेत पास झाल्या होत्या तेव्हा त्यांचं वय 104 वर्ष होतं. मात्र, आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर या बातमीची पुन्हा एकदा चर्चा होतेय. याचं कारण आनंद महिंद्रा हे नेहमीच लोकांना प्रेरणा देणारे, सकारात्मक ऊर्जा देणारे व्हिडीओ ट्वीटद्वारे शेअर करत असतात. कुट्टीअम्मा या आजीचा पास झाल्याचा आनंद पाहून तसेच या वयातही शिक्षणाची असलेली आवड पाहून प्रत्येकानेच या आजीकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे.


साक्षरता परीक्षेच्या वेळी पहिल्यांदा हातात लेखणी


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या आजी कधीच शाळेत गेल्या नाहीत. साक्षरता परीक्षेची तयारी करताना त्यांनी पहिल्यांदा पेन हातात आणि कागद उचलला. केरळचे शिक्षण मंत्री वासुदेवन शिवनकुट्टी यांनी त्यांचा फोटो ट्वीट करत साक्षरता परीक्षेत त्यांना 100 पैकी 89 गुण मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. 104 व्या वर्ष उलटून गेल्यानंतरही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. कुट्टीअम्मा सांगतात की स्वतःची कामं स्वत: केल्यामुळे आणि आयुर्वेदामुळे आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत. माझ्या काळात मुलींच्या शिक्षणावर भर दिला जात नव्हता, तर मुलंही चौथीच्या पुढे शिकत नव्हती. माझे वडील भूमिहीन शेतकरी होते.


आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की...


उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलासाठी हा एक धडा आहे. या महिलेच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवतात की तुम्हाला शिक्षण मिळणे हा किती मोठा विशेषाधिकार आहे आणि हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. जीवनातील सर्वात मोठा आनंद आणि समाधान प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्यातून मिळतो."






दरम्यान, आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वेगवेगळ्या लोकांची गोष्ट आणि व्हिडीओ शेअर करत असतात आणि लोकांना चांगलं मोटिव्हेशन, सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतात. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Anand Mahindra: वेटरची कमाल! एका हातात उचलतो डोशाच्या 16 प्लेट्स; आनंद महिंद्रा देखील झाले इम्प्रेस, व्हिडीओ शेअर