औरंगाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 ला लाल किल्ल्यावरून देशातल्या सौभाग्य योजनेतून सगळ्या वाड्या-वस्त्यांवर वीज पोहोचल्याची घोषणा केली होती. मात्र आजही अनेक गावात वीज पोहोचलेली नाही. असंच एक औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बरड वस्ती हे गाव या गावातील दोनशे लोक गेल्या तीस वर्षांपासून अंधारात राहतात. यांच्या गावापासून विजेचा खांब 200 मीटर अंतरावर आहे. मात्र हे दोनशे मीटर चा अंतर कमी करण्याचे सौभाग्य मात्र ज्यांच्या नशिबी लाभलं  नाही. 


सूर्य मावळला की हे गाव अंधारात गुडूप होतं गावकऱ्यांच्या नशिबी प्रकाश थेट सूर्य उगवल्यानंतर येतो. गेल्या तीस वर्षांपासून हे गाव अंधारलेला आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासून हे गाव केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. औरंगाबाद जळगाव या हायवेपासून गावाचं अंतरही तीन किलोमीटर बरड वस्ती हे गाव आहे. लोकसंख्या 200 च्या आसपास असून ना विज ना पाणी...ना रेशनचं धान्य... 30 वर्षे  अंधारात अशीच निघून गेली आहे. 


रात्रीच्या वेळी बरड वस्तीच्या लोकांना फक्त तेलाच्या दिव्याचा आधार असतो. गावातली तीस-चाळीस मुले शेजारच्या गावात शिक्षणासाठी जातात. अभ्यास दिवसाच तो काय रात्री करायचं असेल तरी वडील करून देत नाहीत कारण रॉकेल मिळत नसल्याने इथे दिवा तेलाचा लावावा लागतो. तेल महाग झाल्याने दिवा लावून अभ्यास करणं ही त्यांना परवडत नाही.देशाचं भविष्य ज्ञानाच्या प्रकाशासाठी  इथे अंधारात चाचपडतयं. 


 लाईटच्या प्रकाशाचं आणि गावाच अंतर केवळ 200 मीटर आहे हे अंतर प्रकाशाचा आणि अंधाराचा आहे गेली तीस वर्षे प्रयत्न करूनही हे अंतर काही कमी झालं नाही.  हे गाव दोन मंत्र्यांच्या मतदार संघातील  आहे. एक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि दुसरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार. दोघेही एकमेकांच्या बत्ती गुल करण्यात दंग असतात. ते गावात दिवा पोहोचणार तरी कसे. गावातील काही तरुण महावितरण, आमदार खासदार यांचे उंबरठे झिजवून थकले  आहे. जसा रात्रीचा चंद्र  ढगासोबत लपंडाव खेळतो,तसाच व्यवस्थेचा लपंडाव या वस्तीच्या आयुष्यात आलाय.हा लपंडाव 30 वर्षांपासून संपायच नाव घेत नाही.


शहरे बदलत असली, तरी बदलत्या गावकुसाबाहेरची ही "बरड वस्ती" बदलण्यासाठी कुणीच पुढे येताना दिसत नाही. उलट इथले शोषण, जीवघेण्या दुःखाचे पापुद्रे, वेदना, दारिद्य्र संपता संपत नाही. शेवटी उकिरड्याचेही दिवस पालटतात असे म्हणतात. मात्र व्यवस्थेचे चटके शोषलेल्या बरड वस्तीचे केंव्हा पालटतील हे व्यवस्थाच जाणे.