नागपूरः सध्या जून महिन्याचे दोनच दिवस शिल्लक आहेत. पूर्ण महिन्यात पावसाची हजेरी खास नसल्याने शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने पाणीपुरवठ्याबाबत चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयात घट झाली आहे. मागील वर्षी जूनमध्ये तोतलाडोह जलाशयातील स्थितीची तुलना केल्यास पाणीसाठा जास्तच कमी झाल्याचे समोर आलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. पावसाने जुलैमध्येही दांडी मारल्यास नागपूरकरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणामाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला होता. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणारे जलसाठे पूर्ण भरले नसले तरी समाधानकारक भर पडली होती. यंदा जून महिन्यातील दोन, तीन दिवस वगळता जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. दररोज आकाशात ढग जमा होत असले तरी पावसाने मात्र हुलकावणी दिली. त्यामुळे आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलसाठ्यात 51.37 टक्के पाणी आहे.
मागील महिन्यात या जलसाठ्यात 56.35 टक्के टक्के पाणी होते. परंतु संपूर्ण जून महिन्यांत नागरिक उन्हाळ्याचीच अनुभूती घेत असल्याने पाण्याचा वापर मे महिन्याप्रमाणेच सुरू आहे. परिणामी तोतलाडोह येथील जलसाठ्यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी जूनमधील पाणीसाठ्याचा विचार केल्यास ही घट नऊ टक्क्यांची आहे. जून महिन्याप्रमाणेच जुलैही कोरडा गेल्यास नागपूरकरांच्या पाणीपुरवठ्यात थेट नाही, परंतु अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेकदा महानगरपालिका, ओसीडब्लू कुठले तरी काम काढून पाणी कपात करीत असते. त्यामुळे जुलैमध्येही अशी कामे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी जलाशय तूर्तास 65 टक्के भरले आहे. मागील महिन्यात आजच्या दिवशी 47.14 टक्के पाणी होते. मागील महिन्याच्या तुलनेत पाणी अधिक आहे. परंतु नवेगाव खैरी जलाशयात तोतलाडोह जलाशयातून पाणी पुरविले जाते. नवेगाव खैरीतून शहराला पाणी मिळते. त्यामुळे पुढील काही दिवस नवेगाव खैरी जलाशयातून पाण्याचा उपसा होईल. परंतु पाऊस न आल्यास हा पाणीसाठाही कमी होणार आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीसाठ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील पाच दिवस पावसाचे संकेत
हवामान खात्याने पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास दोन्ही जलाशयासह कन्हान नदीतही मुबलक पाणी जमा होईल. त्यामुळे शहरावरील संकट दूर होऊ शकते, असे तज्ज्ञांनी नमुद केले.