Murbad News : राज्यभरात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. काही धरणं भरली असून काही भरण्याच्या वाटेवर आहेत. असं असतानाही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (Murbad) तालुक्यातील कोळेवाडी वडखळ या गावातील गावकऱ्यांना पावसाळ्यात देखील पाणीटंचाईला (Water Shortage) सामोरं जावं लागत आहे. प्रशासनाने गावात बोरिंगची सुविधा करुन दिली आहे. मात्र या बोरिंगचे पावसाळ्यात देखील पाणी आटत असल्याने तिला पाणी लागत नाही. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांवर त्यांनी स्वतः खणलेल्या खड्ड्यातून अशुद्ध पाणी (Impure Water) पिण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने साधी विहिरीची व्यवस्थाही त्यांना करुन दिलेली नाही. त्यामुळे मग हे अशुद्ध पाणी त्यांना पिण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी वापरावे लागते. 


बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणलोट क्षेत्राचा भाग देखील वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात धरणाचे पाणी वाढू लागलं की पाणलोट क्षेत्रात पाणी यायला सुरुवात होते. हीच बाब लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने काचकोली, तोंडली, मोहघर, मानिवली जांभुळवाडी या गावांचं पुनर्वसन केला आहे. मात्र कोळीवाडी वडखळ गावाचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही. त्यांना गावठाण भागाची जागा पुनर्वसनासाठी देण्यात आलेली आहे, त्या जागेचे अजूनही प्लॉटिंग झालेलं नाही आणि त्यामुळे गावकऱ्यांना पाणलोट क्षेत्रात राहावं लागतं. 




अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे विविध आजार
मात्र एमआयडीसी प्रशासनाने गेल्या तीन ते चार वर्षात इथे पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांना दररोज सकाळ-संध्याकाळ पायपीट करुन खोदलेल्या खड्ड्यातील अशुद्ध पाणी भरुन आणावं लागतं. हे पाणी प्यायल्याने कुटुंबातील सदस्यांना विशेषतः लहान मुलांना विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आता तरी प्रशासन आमच्याकडे लक्ष देईल काय असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


गावकरी आणि विद्यार्थ्यांवर होडीतून प्रवास करण्याची वेळ
एकीकडे  कोळेवाडी वडखळ गावातील गावकरी पाणीटंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे याच गावकरी आणि विद्यार्थ्यांवर होडीतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. सध्या बारावी धरणात 80 टक्के पाणी आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामधलं पाणी वाढलं आहे. इथून प्रवास करणं जीवघेणं झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांसाठी इथे होडीचा बंदोबस्त केला आहे. मात्र एकच होडी असल्याने गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अर्धा तासाहून अधिक वेळ ताटकळत उभं राहावं लागतं.