ठाणे : येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी संपूर्ण देशात उत्साहाच वातावरण पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील  संस्कृती आर्ट फेस्टीव्हलमध्ये (Upvan Art Festival) यंदा अयोध्येतील 'श्रीराम मंदिराची' प्रतिकृती साकारण्यात येईल. यामुळे संपूर्ण उपवन परिसर हा राममय होणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे नववर्षात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची अनुभूती ठाणेकरांना घेता येणार आहे. 12 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान या फेस्टीव्हलचे आयोजन होणार असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. 


 आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन तर्फे  संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यंदा आयोजित करण्यात येणारा हा फेस्टिवल 'जय श्रीराम'  या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना आमदार प्रताप सरनाईक यांनी 12 जानेवारी रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं म्हटलं. तसेच पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या “भक्तिरंग” या गायनाने फेस्टिव्हलचा प्रारंभ होणार आहे. 


असा असणार संपूर्ण कार्यक्रम


या फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारी रोजी पद्मश्री मालिनी अवस्थी यांच्या अवध आणि बनारस येथील लोक संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 जानेवारी अर्थातच तिसऱ्या दिवशी  भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. चौथ्या दिवशी गायक दिव्य कुमार आपल्या लोक संगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत.उत्सवातील चारही दिवशी आध्यात्मिक गुरु, राजकिय - सामाजिक क्षेत्रातील  दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 


यंदाचं 10 वं वर्ष


मागील काही वर्षांपासून ठाण्यातील उपवन परिसरामध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या उपवन आर्ट फेस्टिवलचं 10 वं वर्ष आहे. यावर बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, उपवन आर्ट फेस्टिवल 12,13,14 आणि 15 जानेवरी रोजी  उपवन तलाव या ठिकाणी सुरू होणार असून यंदाचं हे 10 वं वर्ष आहे. अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचे उद्घाटन होण्याआधी या फेस्टिवलमध्ये देखील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती साकरण्यात येणार आहे.  इतर राजकीय सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. हा राजकीय कार्यक्रम नसून संस्कती फेस्टिवल असल्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रण आम्ही सर्व पक्षातील नेत्यांना देणार आहोत. 


हेही वाचा : 


Chhatrapati Sambhaji Nagar : 3 मंत्री, एक खासदार, एक विरोधी पक्षनेता, एक माजी खासदार, छ. संभाजीनगरात लोकसभेसाठी कोण कोण इच्छुक?