छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. राजकारणात भूकंप झाल्यानंतर जागावाटपाच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झालाय. त्यातच अनेक नेते सध्या लोकसभेची जागा लढवण्यासाठी इच्छा व्यक्त करतायत, तर अनेकांकडून जागांवर थेट दावा व्यक्त केला जातोय. एकीकडे जागा महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरची (Chhatrapati SambhajiNagar) लोकसभा निवडणूक लढवण्यावरुन ठाकरे गटातील दोन नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यामध्ये तू-तू मै-मै सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजूनही एकमत झालेलं नाही. त्यापूर्वीच छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटातून कोण निवडणूक लढवणार यावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या कुरघोडी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं नसलं तरीही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावरून ठाकरे गटात वादाच बिगुल वाजलंय. त्यातच जुने मित्र संजय शिरसाठ यांनी या वादाला फोडणी दिली असून संभ्रम देखील निर्माण केलाय. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघेही लोकसभा निवडणूक लढवतील मात्र कोण कोणत्या पक्षाकडून लढवतील हे सांगण कठिण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण इच्छुक?
इम्तिताज जलील | खासदार | संभाजीनगर |
भागवत कराड | केंद्रीय अर्थराज्यमंत्री | भाजप |
अतुल सावे | गृहनिर्माण मंत्री | भाजप |
संदिपान भुमरे | रोहयो मंत्री | शिंदे गट |
अंबादास दानवे | विरोधी पक्षनेते | ठाकरे गट |
चंद्रकांत खैरे | नेते | ठाकरे गट |
विनोद पाटील | मराठा आरक्षण याचिकाकर्ते |
कोणता उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार?
तब्बल पाच मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक निवडणुकीत संभाजीनगरमध्ये आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावतात. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला संभाजीनगरची जागा सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार याची अधिक चर्चा आहे.
जागा कुणाला मिळणार यावर गणित अवलंबून
एकीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून संभाजीनगरच्या जागेवर दावे प्रतिदावे केले जात असतानाच, याच संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जागा आपल्याला सुटावी म्हणून महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे ही जागा आपल्याला मिळावी यासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून प्रयत्न केले जातायत. त्यामुळे जागा कुणाला सुटते यावर अनेक गणित अवलंबून असतील
पाच मंत्री असलेला जिल्हा आपल्याच ताब्यात घेणं सत्ताधारी पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. तर दुसरीकडे आपली ताकद दाखवण्यासाठी विरोधी पक्ष देखील तेवढ्यात जोमाने मैदानात असणार आहे. त्यातल्या त्यात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील देखील रिंगणात असतील. त्यामुळे संभाजीनगरमध्ये कोणाचा विजयाचा झेंडा फडकतो हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच, मात्र त्यापूर्वी कोणत्या पक्षाला आणि त्यातल्या त्यात कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.