MHADA Konkan Lottery result मुंबई :  म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४  रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. 


राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार्‍या या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील,   राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री श्री. शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त  मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.  अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात  येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे.


विजेत्यांना SMS


सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच  विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.


सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System)द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास  सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  


५३११ सदांनिकांच्या विक्रीकरिता सोडत


दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील ५३११ सदांनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली होती.  या सोडतीसाठी आतापर्यंत एकूण ३१८७१ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह २५०७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. 


कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० सदनिकांचा समावेश आहे. तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ सदनिका,  सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २२७८ सदनिका आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता २० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.  


संबंधित बातम्या 


MHADA : म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला; स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सविस्तर जाणून घ्या