Thane Water Cut : ठाणेकरांची बुधवारी, 20 डिसेंबर रोजी पाण्याअभावी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील काही भागांमध्ये महापालिकेच्यावतीने होणारा पाणीपुरवठा बंद राहणार (Water Cut in Thane City) आहे. पाणीपुरवठा योजनेतील देखभाल आणि इतर कामांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीची महत्वाची कामे करण्याकरिता बुधवारी काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती दिली आहे. बुधवार दिनांक सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरूवार सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली.
कधी आणि कुठं असणार पाणीपुरवठा बंद?
ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा बुधवार दिनांक 20/12/2023 सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. तर, समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्यातील आणि मुंब्रा परिसरातील काही भागात बुधवारी रात्री 9 ते गुरूवार सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशा रितीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद
पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवार 21 डिसेंबर रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आलाय. तसेच पुण्यात शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून जाहीर नोटीस देखील काढण्यात आलीये. पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमध्ये गुरुवारी पाणी येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.