Shahapur News: शहापूर तालुक्यात गेल्या 12 दिवसांपासून वेहळोली गावासह 12 ते 14  गावांना भूकंपाचे हादरे बसत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची तीव्रता 2.5 लोकल मॅग्निट्यूड इतकी असून त्याचे केंद्र बिंदू पालघर येथील चारोटी नाका तसेच नाशिक भागात असल्याचे हैदराबाद येथील एनजीआरआय या एजन्सीने स्पष्ट केले आहे.  भूकंपाचा धक्का बसलेल्या 14 गावांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर बसलेले धक्के अधिक तीव्रतेचे होते. दुपारी 1 वाजता, दुपारनंतर साडेचार वाजता , सायंकाळी 5.46 वाजता आणि रात्री 1.34 वाजता असे एकाच दिवसात 4 ते 6 धक्के वेहळोली परिसरात बसले आहेत. 


सायंकाळी 5.46 वाजता बसलेला हादरा इतका मोठा होता की वेहळोलीसह चिखलगाव, किन्हवली, लवले, खरीड, ठुणे, चेरवली, खरीवली, सावरोली, सोगाव इत्यादी 14 गावांत घरे व जमीन हादरली. काही ठिकाणी घराला तडा जाणे, भांडी पडणे अशा घटना घडल्या. सातत्याने भूकंपाचे हादरे होत असल्याने नागरिक एवढे भयभीत झाले आहेत की आपल्या घराबाहेर अंगणामध्ये कॉट टाकून झोपतात. परंतु त्यांना रात्र जागरण करूनच काढावी लागत आहे. घरांना तडे गेल्यानं त्याची भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे


भातसा धरणामध्ये हैदराबाद येथील एन.जी.आर.आय.संस्थेने बसवलेल्या ऍक्सेलॉग्राफ या यंत्राने हे धक्के भूकंपाचे असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. 29 नोव्हेंबरला सायंकाळी 5.46 वाजता धरणापासून 24 किमी दक्षिण- पूर्व स्थानावर केवळ 2.7 लोकल मॅग्निट्युड इतका धक्का नोंदवला गेला आहे. तसेच या गावांमध्ये वारंवार भूकंपाच्या धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये एकंदरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाच्या वतीने देखील उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 


परिसरात गावाबाहेर टेंट बांधले
परिसरात गावाबाहेर टेंट बांधण्यात आले असून त्यामध्ये प्लॉटची व्यवस्था करण्यात आली आहे. गावकऱ्यांची घराबाहेर झोपण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु ही व्यवस्था अपुरी असल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गावात शासकीय यंत्रणा दाखल होऊन घरांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. गावकऱ्यांनी जास्तीत जास्त घराबाहेर राहावे आणि रात्री घराबाहेर झोपावे असं आवाहन  देखील करण्यात येत आहे.


प्रांत अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सांगितले की गरजेनुसार आम्ही इथे व्यवस्था देत आहोत. तसेच आज 100 पेक्षा अधिक कॉटची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे . टेंट बांधण्यात आले आहेत.  भूकंपाचे धक्के वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये एकंदरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


भूकंपाचे हादरे बसत असलेल्या गावांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री  कपिल पाटील यांनी भेट दिली. त्यांनी आज शहापूर तालुक्यातील भूकंपग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी बातचीत करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच तडा गेलेल्या घरांची पाहणी देखील त्यांनी केली. त्याशिवाय गावकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी याकरता दहा हजार रोख रक्कम तसेच ब्लॅंकेट, चादर आणि रेशन किट कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने देण्यात येत असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.