ठाणे : मुंबई आणि नजीकच्या शहरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, ठाणे (Thane Rain) डोंबिवली, वसई आणि नवी मुंबईत पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी ठाणे शहरात धुमशान घातले. अवघ्या दहा तासात शहरात तब्बल 95.94 मीमी विक्रमी पावसाची नोंद झाली. या वर्षातील एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद शुक्रवारी झाली.
सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत म्हणजेच नऊ तासात तब्बल 103.11 मीमी विक्रमी पावसाची नोंद ठाण्यात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील वंदना, टेकडी बंगला, भास्कर कॉलनी, उथळसर गवळी वाडा, चितळसर पोलीस ठाण्याच्या आवारात, मुंब्रा ठाकुर पाडा आणि जुना आरटीओ ऑफिस परिसरात आणि इतर ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. सकाळपासून पडणाऱ्या या पावसामुळे शहरातील वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक मुख्य रस्त्यांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. त्यात शहराच्या अनेक भागातील रस्त्यांना पडलेल्या खडय़ांमुळे देखील वाहतुकीला ब्रेक लागल्याचे दिसून आले. दुपारी 4 वाजेपर्यंत पावसाचा जोर दिसून आला. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि सखल भागातील पाण्याचाही निचरा झाला आणि वाहतक काही अंशी रुळावर आल्याचे दिसून आले. दरम्यान मागील वर्षी या दिवसापर्यंत 3164.27 मीमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत 2663.75 मीमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले.
ठाण्यात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे. तर वृक्ष आणि वृक्षाच्या फांद्या पडण्याच्या घटना दिवसभरात घडल्या. तसेच एका ठिकाणी झाड कोसळले तर दोन घटनांमध्ये झाडांच्या फांदया दोन दुकानांसह एका चारचाकी गाडीवर कोसळल्या आहेत.
राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या तीन दिवसांत पाऊस कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांना 'ऑरेंज ऍलर्ट' जारी करण्यात आला आहे. आज पुणे, सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक भागात पावसाने चांगलंच झोडपलंय. पावसाचं जोर कमी होत नसल्यामुळे आता बळीराजाची चिंतादेखील वाढलीय.